आभासी जगाचे ‘९डी सिम्युलेटर’मधून दिसणारे अनोखे रूप, जेट विमानातून उंचावर भराऱ्या मारतानाचा थरार देणारा ‘फ्लाइंग सिम्युलेटर’, आभासी वादन करणारा एरोड्रम अशा तंत्रज्ञानाच्या अफलातून करामती अनुभवायच्या असतील तर यंदा ‘टेकफेस्ट’ला भेट देण्याशिवाय गत्यंतर नाही.
‘नवमिती’तून (९डी) दिसणारे अनोखे जग अनुभवायचे असेल तर यंदाच्या टेकफेस्टशिवाय पर्याय नाही. भारतात थ्रीडीची संकल्पनाही पूर्णत: रुजलेली नसताना आभासी जगाचे दालन नवमितीतून दाखविणारा ‘९डी सिम्युलेटर’ हा यंदाच्या टेकफेस्टमधील ‘ओझोन’ या मनोरंजनपर तंत्रज्ञान विभागाचे आकर्षण असणार आहे. लहानांपासून थोरांपर्यंत कुणालाही येथील तंत्रज्ञानाचा अनुभव घेता येतो हे ओझोनचे वैशिष्टय़. या वर्षीही ड्रोनच्या स्पर्धा, लेझर युद्ध, एफ १ सिम्युलेटर (फॉर्मुला १ रेसिंग कार), बीएमएक्स बाइक्स, पेंटबॉल, कुठल्याही पृष्ठभागावर चालणाऱ्या गाडय़ांचा थरार असे एकापेक्षा एक अनुभव ओझोनमध्ये घेता येणार आहे. तर
टेक्नोहोलिक्समध्ये जादू, फायर शोज, अ‍ॅक्रोबॅट्स अशा अनेक गोष्टींचा आनंद लुटता येणार आहे.
याशिवाय विविध देशी-विदेशी कलाकारांच्या कलांचा आनंदही प्रेक्षकांना घेता येणार आहे. यात इंग्लंड, इटली, युक्रेन, लिथुआनिया आदी देशांतील कलाकार यंदा टेकफेस्टमध्ये हजेरी लावणार आहेत. याशिवाय रोबोवॉर या सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांना लाखो बक्षिसांची लयलूट करता येणार आहे.
संचालकांची हजेरी
यंदा देशभरातील विविध आयआयटीचे पाच संचालक पहिल्यांदाच एकत्रितपणे टेकफेस्टला हजेरी लावणार आहेत. देवांग खक्कर, इंद्रनील मन्ना, पुष्पक भट्टाचार्य, गौतम बिस्वास, उदय देसाई यांचा समावेश असणार आहे. या संचालकांशी विद्यार्थ्यांना थेट संवाद साधता येणार आहे.

‘टेकफेस्ट’
हा पवईच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’चा (आयआयटी) तंत्र महोत्सव आहे. भारतातला सर्वाधिक मोठा तंत्र व विज्ञान महोत्सव अशी ओळख असलेल्या या महोत्सवात विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला व सर्जनशीलतेला आव्हान देणाऱ्या अनेक स्पर्धाचा समावेश असतो. परंतु तंत्रज्ञान, विज्ञान यात रस असलेल्यांकरिताही टेकफेस्टच्या ओझोन आणि टेक्नोहोलिक्स या विभागांमधून तंत्रज्ञानाचा मनोरंजनाच्या अंगाने आनंद घेता येतो. यंदा २६ ते २८ डिसेंबरदरम्यान हा महोत्सव रंगणार आहे.