व्यावसायिक अभ्यासक्रमांची शुल्कवाढ रद्द करण्याच्या निर्णयाला संस्थाचालकांनी विरोध करताना गरजू विद्यार्थ्यांना सवलती देण्याच्या पर्यायाला सुद्धा केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे शुल्कवाढीचा ससेमिरा विद्यार्थ्यांमागे कायम आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या मुळातच लाखो रुपयांच्या घरात असलेल्या शुल्कात दर दोन वर्षांनी वाढ होते. करोनाची साथ येण्यापूर्वी अनेक महाविद्यालयांना १० ते १५ टक्क्य़ांनी शुल्कवाढ मंजूर करण्यात आली होती. आता प्रवेशानंतर महाविद्यालये प्रत्यक्ष सुरू होणार की ऑनलाइन सुरू होणार याबाबत अद्यापही संदिग्धता आहे. शुल्क नियमन प्राधिकरणाने महाविद्यालयांना वापराव्या लागणाऱ्या सुविधा, मंदीची परिस्थिती, विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती अशा मुद्दय़ांच्या आधारे या शैक्षणिक वर्षांची (२०२०—२१) १० टक्के शुल्कवाढ रद्द करण्याचा ठराव केला होता. त्याचप्रमाणे पुढील शैक्षणिक वर्षांतही (२०२१—२२) संस्थांना शुल्कवाढ मागता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र प्राधिकरणाच्या या ठरावाला संस्थाचालकांनी विरोध केला आणि शुल्कवाढ रद्द करण्याऐवजी गरजू विद्यार्थ्यांना सवलती, अभ्यासवृत्ती अशा सुविधा देण्याचा पर्याय सुचवला होता. प्राधिकरणाने संस्थाचालकांपुढे नमते घेत शुल्कवाढ रद्द करण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर आता संस्थाचालकांना आपल्या आश्वासनाचा विसर पडल्याचे दिसत आहे. कोणत्या सवलती, कशा स्वरूपात देणार हे जाहीर करण्याची सूचनाही प्राधिकरणाने दिली होती. मात्र, संस्थांनी अशी कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.

दोन अभ्यासक्रमांच्या शुल्काचा भार

तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया रखडल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला होता. इतर पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्राची परीक्षाही अनेकांनी दिली. या अभ्यासक्रमांसाठी घेतलेले प्रवेश रद्द करून विद्यार्थ्यांना दुसऱ्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा लागणार आहे. नियमानुसार एक सत्र झाल्यानंतर वर्षभराचे शुल्क भरले असल्यास ते सर्व परत मिळू शकत नाही. विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केल्यास आता महाविद्यालयांनाही दुसरे विद्यार्थी मिळणे शक्य नसल्यामुळे महाविद्यालयांनाही शुल्क परत करणे जड जाणार आहे. त्यामुळे मूळातच तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाचे शुल्क आणि दुसऱ्या अभ्यासक्रमाला घेतलेल्या प्रवेशाचे शुल्क अशा दोन्हीचा भार विद्यार्थ्यांना उचलावा लागण्याची शक्यता आहे.

‘अतिरिक्त शुल्क घेतल्यास तक्रार करा’

शुल्क नियमन प्राधिकरणाने सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांचे शुल्क निश्चित केले आहे. सर्व महाविद्यालयांच्या शुल्काचे तपशील प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर आहेत. महाविद्यालयांनीही हे तपशील त्यांच्या संकेतस्थळावर जाहीर करणे अपेक्षित आहे. प्राधिकरणाने मंजूर केलेल्या शुल्काव्यतिरिक्त इतर कोणत्याही मार्गाने किंवा कारणासाठी महाविद्यालये अतिरिक्त शुल्क मागत असल्यास त्याची शुल्क नियमन प्राधिकरणाकडे तक्रार करावी, असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे.