मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पुन्हा एकदा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. कल्याणच्या दिशेने जाणारी वाहतूक अर्धा तास उशिराने सुरू आहे. तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे अशी माहिती ‘एबीपी माझा’ने दिली आहे. तरीही मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू असल्याने घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. तर हार्बरवरील ऐरोली रेल्वे स्थानकात गेल्या काही तासांपासून विद्युत प्रवाह खंडित झाला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून मध्य रेल्वेची अवस्था ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी झाली आहे. आज सकाळीच वांगणी स्टेशनजवळ इंद्रायणी एक्स्प्रेसच्या इंजिनात जनावर अडकले होते. त्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक काही काळ बंद झाली होती. ती सुरळीत होते न होतेच तोच पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून दर आठवड्याला प्रवाशांना ही समस्या सहन करावी लागते आहे.