पनवेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या दरम्यान चालणारी हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झाली आहे. या मार्गावरील रे रोड स्थानकादरम्यान ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने वाहतूक थांबली असल्याचे सांगण्यात येत आहे. ऐन गर्दीच्या वेळी वाहतुकीचे तीन-तेरा वाजल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत.

सोमवार आणि त्यात सायंकाळची वेळ यामुळे भर संध्याकाळच्या वेळी कार्यालयीन कर्मचारी आणि चाकरमानी आपल्या घराची वाट धरण्यासाठी गडबडीत असतात. अशा वेळी रेल्वे मार्गावर बिघाड झाल्यामुळे हार्बरच्या अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांची प्लॅटफॉर्मवर तुडुंब गर्दी पाहायला मिळाली. सांयकाळी ६ वाजताच्या सुमारास हा बिघाड झाला असे सांगण्यात येत असून रे रोड स्थानकात असलेल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये छोटे स्फोट झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

ताज्या माहितीनुसार हा बिघाड दुरुस्त करण्यात आला असून वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरु करण्यात आली असल्याचे समजत आहे. मात्र सुमारे तास – दीड तासापासून वाहतूक खोळंबलेली असल्यामुळे प्रवाशांची प्लॅटफॉर्मवर तुडुंब गर्दी दिसून येत आहे.