|| नीलेश अडसूळ

ऑनलाइन परीक्षेत तंत्रज्ञानाशी जुळवून घेताना विद्यार्थ्यांची तारेवरची कसरत

मुंबई : करोनाकाळात परीक्षा होणार की नाही या रंगलेल्या वादातून वाट काढत अखेर परीक्षा जाहीर झाल्या खऱ्या, पण तंत्रज्ञानाचा आधार घेऊन घेण्यात आलेल्या या परीक्षा देताना विद्यार्थ्यांची मात्र कसरत सुरू आहे. सध्या इंटरनेट आणि अद्ययावत मोबाइल सगळ्यांकडे असले तरी ऑनलाइन माध्यमातून परीक्षा देण्याची ही पहिलीच वेळ असल्याने प्रत्येकाच्या अनुभवात वेगळेपण असल्याचे विद्याथ्र्यांच्या प्रतिक्रियांमधून समजते.

मुंबई विद्यापीठाच्या ‘दूर आणि मुक्त शिक्षण (आयडॉल) विभागा’ने घातलेला परीक्षेचा घोळ विद्यापीठाच्या अंगाशी आला. परंतु त्यानंतर परीक्षा पुढे ढकलल्याचा मनस्ताप विद्याथ्र्यांना होत आहे. ‘वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर परीक्षेची लगबग सुरू झाली. विद्यापीठाकडून आलेली एमयू एक्झाम या अ‍ॅपची लिंक प्रत्येक मोबाइलमध्ये डाऊनलोड होत नव्हती. त्यासाठी पुन्हा संगणक, लॅपटॉपची व्यवस्था करावी लागली. काहींना तर दोन दिवस उलटूनही लिंक मिळाली नाही. हे अ‍ॅप कसे वापरायचे यासाठी पीडीएफ फाइल दिली होती. पण प्रत्यक्ष अडचणी वेगळ्याच दिसल्या. आता परीक्षा पुढे ढकलली, पण हा घोळ मनस्ताप देणारा आहे. अशी अनिश्चितता असेल तर पुढेही परीक्षा सुरळीत होतील याची खात्री काय,’ अशी प्रतिक्रिया ‘आयडॉल’मधील पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षातील मयूरी धुमाळ या विद्यार्थिनीने दिली.

विद्यापीठाच्या पत्रकरिता विभागातही हाच घोळ होता. ‘परीक्षेसाठी दिली जाणारी लिंक काही विद्याथ्र्यांना दोन दिवस आधी तर काहींना एक तास आधी मिळाली. त्यामुळे परीक्षा देता येईल की नाही याबाबतच संभ्रम होता. विद्यार्थी हेल्पलाइन क्रमांकावर सतत संपर्क साधत होते. काहींना तर पंधरा मिनिटे आधी लिंक मिळाली. पर्यायाने लॉगिन होण्याची प्रक्रिया पार पडून एका तासाच्या परीक्षेत अवघे वीस ते पंचवीस मिनिटे वेळ विद्यार्थ्यांच्या हातात उरला. काहींच्या बाबतीत तर तो अ‍ॅप ना मोबाइलवर सुरू झाला ना लॅपटॉपवर. अशांना आता पुन्हा परीक्षेला बसावे लागणार आहे.

वर्षभराच्या अभ्यासाचा काय फायदा?

विद्यार्थी परीक्षेच्या स्वरूपाबाबतही नाराज होते. रुपारेल महाविद्यालयातील एका बीएमएसची परीक्षा देणाऱ्या विद्याथ्र्यांने हा अनुभव मांडला. या अभ्यासाचा भर बहुतांश गणितांवर आहे. वर्षभर त्यांनी जीव तोडून अभ्यास केला. परंतु परीक्षा एमसीक्यू पद्धतीने घेण्यात आल्याने केलेल्या अभ्यासाचा परीक्षेसाठी काहीच फायदा झाला नाही, असे विद्यार्थी सांगतात. ‘परीक्षा सुरळीत झाली. परंतु परीक्षेचे स्वरूप न पटणारे होते. त्यात एक दिवस नियोजित विषयाऐवजी वेगळ्याच विषयाची प्रश्नपत्रिका समोर आली. त्यामुळे तोही दिवस वाया गेला. परीक्षेबाबत निर्णय घेण्यात दिरंगाई झाल्याने आमच्या पुढील वाटचालीवर परिणाम होणार आहे, अशी प्रतिक्रिया एका विद्यार्थिनीने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

शिक्षकांचे सहकार्य

रुईया महाविद्यालयातील सचिन चिकणे हा तृतीय वर्ष कला शाखा मराठी साहित्याची परीक्षा देणारा अंध विद्यार्थी मात्र वेगळा अनुभव सांगतो. ‘एरव्ही आम्हाला लिहिणारे सहकारी हवे असतात. परंतु यंदा घरूनच परीक्षा होत असल्याने ही भूमिका घरच्यांनी पार पाडली. घरच्यांना परीक्षेबाबत सर्व माहिती पोहोचवण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांचे मोठे सहकार्य झाले.’