रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्य़ाने आज(बुधवारी) सकाळी प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. हार्बर रेल्वेच्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक एकाच वेळी विस्कळीत झाल्याने प्रवाशांच्या अडचणींमध्ये दुहेरी भर पडली आहे. या मार्गावरील तुर्भे आणि कोपरखैरणे या स्थानकांदरम्यान रेल्वे ट्रॅकला सकाळी साडेसातच्या सुमारास तडा गेल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली. यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने हाती घेतलेले दुरुस्तीचे काम अद्याप सुरू आहे. यामुळे या मार्गावरील वाहतुक सुमारे २५ मिनिटे उशिराने सुरू आहे.वाहतुक विस्कळीत झाल्याने कामावर निघालेल्या चाकरमान्यांची ठाणे रेल्वे स्टेशनवर गर्दी झाली आहे.