पूर्वीच्या काळी चित्रपटसंगीताचे ध्वनिमुद्रण म्हणजे मोठे प्रस्थ असायचे. शंभर शंभर वादकांचा ताफा, एकाची चूक झाली तरी पुन्हा पहिल्यापासून ध्वनिमुद्रण, गायक-गायिकांची तालीम या सगळ्यामुळेच स्टुडियोमध्ये राजेशाही वातावरण असायचे. त्या वेळी त्या परिसरात सामान्य माणसाला शिरकाव करणेही शक्य नव्हते. मात्र तंत्रज्ञान आल्यानंतर यापैकी अनेक गोष्टींना फाटा मिळाला आणि ज्यांचा संगीताशी फारसा संबंध नाही, अशांनाही या प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळाली. एका अर्थाने तंत्रज्ञानाने केलेले हे संगीताचे लोकशाहीकरणच आहे, असे मत तरुण तडफदार आणि प्रयोगशील संगीतकार स्नेहा खानवलकर हिने व्यक्त केले.
‘लोकसत्ता’ आयोजित ‘व्हिवा लाउंज’ या कार्यक्रमाच्या या पर्वाची पाहुणी म्हणून स्नेहाने बुधवारी रवींद्र नाटय़ मंदिराच्या मिनी थिएटरमध्ये ‘लोकसत्ता’च्या वाचकांशी संवाद साधला. स्नेहाशी गप्पा मारणे म्हणजे तिची स्वत:ची एक मैफल ऐकण्याचा आनंद घेण्यासारखे आहे, अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांमधील अनेकांनी व्यक्त केली. मुळच्या इंदूरच्या असलेल्या स्नेहाच्या घरात शास्त्रीय संगीताची मोठी परंपरा आहे.
ग्वाल्हेर घराण्याचे पं. राजुरकर हे स्नेहाच्या आईचे काका! त्यामुळे शास्त्रीय संगीतापासून सुरू झालेला स्नेहाचा संगीतमय प्रवास आता लोकसंगीतापर्यंत येऊन पोहोचला आहे. या प्रवासाबद्दल स्नेहाने खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या.
अ‍ॅनिमेशन क्षेत्राचे प्रशिक्षण घेतलेल्या स्नेहाला त्या क्षेत्रात स्वत:चे भविष्य काही फार उज्ज्वल दिसले नाही. त्याऐवजी तिने संगीताचा मार्ग निवडला. लहानपणी शास्त्रीय संगीताचा कंटाळा करणाऱ्या स्नेहाला जबरदस्ती संगीत ऐकायला बसवायचे. त्यामुळे आपण प्रचलित संगीताच्या पलिकडे जाऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न करायचे ठरवले.
त्यात मग देशाच्या विविध प्रांतांतील लोकसंगीताचा अभ्यास करायला तिने सुरुवात केली. त्यासाठी तिने देशातील अनेक राज्यांत प्रवासही केला. ‘ओय लक्की लक्की ओय’ किंवा ‘गँग्ज ऑफ वास्सेपूर भाग एक आणि दोन’ या चित्रपटांच्या संगीतातून तिचा अभ्यास नक्कीच दिसतो.
संगीताबरोबरच तिने इंदूर, मुंबई या शहरांबद्दल तिच्या आठवणी, देशभ्रमंती करताना तिला आलेले अनुभव, चित्रपट संगीताबद्दलची तिची मते अशा अनेक गोष्टींबद्दल तिने मनमोकळ्या गप्पा मारल्या. तसेच प्रेक्षकांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरेही तिने तेवढय़ाच मोकळेपणे आणि आत्मविश्वासाने दिली.