डिजिटल तंत्रज्ञानामुळे फिल्ममेकिंगमध्ये मोठे बदल झाले आहेत. याचा फायदा अनुबोधपटांची ही चळवळ पुढे नेण्यासाठी होतो आहे, मात्र तंत्रज्ञानाची मदत असली तरी अनंत आर्थिक अडचणी असतानाही अनेक चित्रपटकर्मी ज्या तडफेने अनुबोधपट करतात. अनुबोधपटांच्या माध्यमातून विविध सामाजिक, आर्थिक समस्यांची मांडणी ते ज्या प्रगल्भतेने करत आहेत ते पाहता हे अनुबोधपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेच पाहिजे. देशभरातील लोकांना हे अनुबोधपट पाहता यावेत, यासाठी ‘डीडी भारती’ या सरकारी वाहिनीचे व्यासपीठ उपलब्ध करण्याचा विचार सुरू असल्याचे केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री राजवर्धन राठोड यांनी सांगितले.
१४व्या ‘मुंबई इंटरनॅशनल डॉक्युमेंट्री, शॉर्ट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमेशन फिल्म फेस्टिव्हल २०१६’चे (मिफ्फ) उद्घाटन गुरुवारी प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री राजवर्धन राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. महोत्सवाचे संचालक मुकेश शर्मा, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल आणि ‘मिफ्फ’चे सदिच्छादूत अभिनेता जॅकी श्रॉफ या वेळी उपस्थित होते. अनुबोधपट, लघुपटांची संस्कृती देशात रुजण्याच्या दृष्टीने ‘मिफ्फ’सारख्या महोत्सवांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. देशभरातील चित्रपटकर्मीना आपल्या विचारांचे आदानप्रदान करण्यासाठी या महोत्सवाच्या माध्यमातून मोठे व्यासपीठ तयार झाल्याची प्रशंसाही राठोड यांनी या वेळी बोलताना केली.
‘फिल्म्स डिव्हिजन’, माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि राज्य सरकारच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव ३ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असून एकूण ३८५ चित्रपट या सहा दिवसांच्या महोत्सवात दाखवण्यात येणार आहे. लघुपटनिर्मितीचे महत्त्व लक्षात घेऊन दादासाहेब फाळके चित्रनगरीत ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅनिमेशन अ‍ॅण्ड शॉर्ट फिल्म्स’ उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची राज्य सरकारची तयारी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. यावर्षी पहिल्यांदाच अशा प्रकारच्या महोत्सवासाठी सदिच्छादूत म्हणून जबाबदारी स्वीकारणाऱ्या अभिनेता जॅकी श्रॉफ यांनीही लघुपट आपल्यासाठी जिव्हाळ्याचा विषय असल्याचे नमूद केले.
‘माझ्या आईचा तुर्कमेनिस्तान ते भारत हा प्रवास मला लघुपटाच्या माध्यमातून लोकांसमोर आणायचा आहे,’ असे जॅकी श्रॉफ यांनी या वेळी सांगितले. या समारंभात वन्यजीवन आपल्या कॅमेऱ्यातून टिपणारे ज्येष्ठ चित्रपटकर्मी नरेश बेदी यांना ‘व्ही. शांताराम जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ‘एफटीआयआय’चे विद्यार्थी असलेल्या नरेश बेदी यांनी आत्तापर्यंत ‘नॅशनल जिओग्राफिक चॅनेल’, ‘डिस्कव्हरी’, ‘बीबीसी चॅनेल’साठी विविध लघुपट तयार केले आहेत. त्यांना केंद्रीय मंत्री राजवर्धन राठोड आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ५ लाख रुपये रोख, शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

दिग्दर्शकोंची गळचेपी करण्यात रस नाही..
सध्या विविध कारणांवरून चित्रपटांना कात्री लावणाऱ्या सेन्सॉर बोर्डाच्या कारभारामुळे नावाजलेले चित्रपटकर्मी जेरीस आले आहेत. सेन्सॉर बोर्डाच्या कारभाराबद्दल चहुबाजूंनी होणारी नापसंती आपल्याला माहिती आहे, मात्र दिग्दर्शकांच्या सर्जनशीलतेला अशा पद्धतीने मारून टाकून त्यांची गळचेपी करण्यात सरकारला रस नसल्याचे राजवर्धन राठोड यांनी या वेळी स्पष्ट केले. सेन्सॉर बोर्डाच्या कारभारात पूर्ण बदल करण्याच्या दृष्टीनेच श्याम बेनेगल यांच्या नेतृत्वाखाली समितीची नेमणूक करण्यात आली असल्याचेही राजवर्धन यांनी या वेळी सांगितले.