कुरिअर सेवा म्हणजे आपण एखाद्या कुरिअरच्या कार्यालयात जायचे आणि आपली वस्तू तेथे नेऊन द्यायची. मग ती वस्तू आपल्याला पाहिजे तिथे कमीत कमी वेळात पोहचवली जाते. सामान्य ग्राहकाचा कुरिअरशी एवढाच संबंध असला तरी लघुउद्योगांपासून बडय़ा उद्योगांपर्यंत कुरिअरची सेवा फार महत्त्वाची आहे. अगदी देशात सामानाची ने-आण असो किंवा परदेशात सामानाची ने-आण असो. यासाठी कंपन्यांना भरपूर पैसे मोजावे लागतातच याचबरोबर मोठय़ा प्रमाणावर कागदपत्रेही तयार करावे लागतात. बडय़ा कंपन्यांमध्ये हे सर्व सांभाळण्यासाठी खास माणसांची नियुक्ती केली जाते. मात्र छोटय़ा आणि लघुउद्योगांना यासाठी माणसे नेमणे शक्य नाही. अशा वेळी ते एकाच कोणत्या तरी कुरिअर कंपनीवर अवलंबून राहात असे. मग ती कंपनी सांगेल तो दर त्यांना द्यावा लागतो. मात्र या कंपन्यांना त्यांना परवडेल अशा दरात सामानाची ने-आण करणाऱ्या कंपन्यांची माहिती उपलब्ध करून द्यावी आणि व्यवहार अगदी सहज व सुलभ व्हावा या उद्देशाने मुंबईकर भाविक चिनाई अणि रोहित चेंबूरकर यांनी मिळून http://www.vamaship.com या संकेतस्थळाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या साह्य़ाने सर्वाना जोडण्याचा प्रयत्न केला.

लघुउद्योगांना कमीत कमी खर्चात त्यांच्या सामानाची ने-आण करता यावी या उद्देशाने या संकेतस्थळाची निर्मिती झाली. हे संकेतस्थळ म्हणजे कुरिअर कंपन्यांचे ई-व्यापार संकेतस्थळ म्हणून ओळखले गेले. संकेतस्थळ सुरू करण्यापूर्वी भाविक आणि रोहितने त्यांचे मित्र आणि इतर कंपन्यांमधील अनेकांशी बोलून या क्षेत्रात त्यांना जाणवणाऱ्या अडचणी समजून घेतल्या. यात त्यांना असे लक्षात आले की हे सर्व व्यवहार आजही ऑफलाइन होतात. यामुळे त्यांना वेळ आणि पैसा खूप जास्त खर्च होतो. तसेच कंपनी ते नियमित ज्या कंपनीच्या माध्यमातून कुरिअर सेवेचा लाभ घेतात त्यांच्यावरच अवलंबून राहतात. यामुळे कंपन्यांना इतर कुरिअर कंपन्या नेमकी कोणती सेवा आणि किती पैशांत सेवा देतात हे समजणे अवघड जात होते. याचबरोबर कुरिअर कंपन्यांनाही सर्वच कंपन्यांपर्यंत पोहचणे शक्य नव्हते. यानंतर त्यांनी या दोन्हीमधील दुवा होण्याचा निर्णय घेतला आणि तंत्रज्ञानाची मदत घेत ते शक्य केले. यातूनच ऑक्टोबर २०१५मध्ये या संकेतस्थळाचा जन्म झाला. या संकेतस्थळावर छोटय़ा कुरिअर सेवेपासून मोठय़ा कुरिअर सेवांची माहिती कंपन्यांना मोफत मिळू लागली. यामुळे लघुउद्योगांना त्यांना परवडेल अशा कंपनीशी व्यवहार करून वस्तूची ने-आण करणे शक्य झाले.

असे चालते संकेतस्थळ

या संकेतस्थळावर सुविधेचा लाभ घेण्याऱ्यांना नोंदणी करावी लागते. यानंतर संकेतस्थळावर आपल्याला कोणती वस्तू कोणत्या ठिकाणाहून कोणत्या ठिकाणी पाठवायची आहे याबाबतचा तपशील भरावयाचा. हा तपशील भरल्यानंतर तुम्हाला पाहिजे ती सेवा पुरविणाऱ्या कंपनीची माहिती संकेतस्थळावर झळकते. ही माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला पाहिजे त्या कंपनीसोबत तुम्ही शिपमेंट नोंदवू शकता. त्याची नोंदणी झाल्यानंतर ती वस्तू पाठविण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे तयार होऊन तुम्हाला मिळतात. त्याची प्रत काढून तुमच्या रेकॉर्डला ठेवावी. यानंतर तुमची वस्तू घेण्यासाठी कंपनीचा माणूस तेथे येईल आणि ती तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी पोहचवेल. तुमची वस्तू तुमच्या कंपनीतून बाहेर गेल्यावर ती सध्या कुठे आहे याची अद्ययावत माहितीही तुम्हाला मिळणे संकेतस्थळाच्या माध्यमातून शक्य होणार असल्याचे भाविकने सांगितले. हे संकेतस्थळ विकसित करण्यासाठी आणि कंपनी चालविताना तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. संकेतस्थळावर एकावेळी दहा हजार ते दोन कोटी वापरकर्त्यांनी भेट दिली तरी ते कोलमडणार नाही इतक्या क्षमतेचे सव्‍‌र्हर्स वापरण्यात आले आहेत. याचबरोबर काम प्रभावीपणे व्हावे यासाठी अंतर्गत चॅट सुविधाही देण्यात आली आहे. यामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांना एकमेकांशी संपर्क साधणे सहज शक्य होते आणि काम जलदगतीने होते असे रोहित सांगतो. याचे अ‍ॅण्ड्रॉइड आणि आयओएस अ‍ॅप असून त्याद्वारेही नोंदणी करणे शक्य होते. तसेच डेस्कटॉप, मोबाइल, टॅबलेट अशा कोणत्याही उपकरणावर संकेतस्थळ सुरू केले तरी ते समान दिसेल अशी रचना करण्यात आल्याचेही रोहीतने सांगितले.

गुंतवणूक आणि उत्प्न्नस्रोत

ही कंपनी चालविण्यासाठी भाविक आणि रोहितने सुरुवातीला बीव्हीसी वेंचर्समधून काही निधी मिळवला आहे. या निधीच्या मदतीने कंपनी दीड वष्रे काम करू शकत असल्याचा विश्वास भाविकने व्यक्त केला. तर संकेतस्थळाच्या माध्यमातून नोंदणी झाल्यानंतर व्यवहार पूर्ण झाल्यावर कुरिअर कंपनीकडून वामाशिप काही टक्के  कमिशन घेते. हा या कंपनीचा मुख्य उत्पन्नस्रोत आहे. सध्या कंपनीला चांगला वेग आला असून सुरुवातीला केवळ मुंबईपुरतीच मर्यादित ठेवण्याचा मानस होता तो बदलत कंपनीची कार्यालये मुंबईसह दिल्ली आणि बेंगळुरू येथेही सुरू झाली. येत्या दिवाळीपर्यंत आणखी महत्त्वाच्या शहरात कंपनीची कार्यालये सुरू करण्याचा मानस आहे. कंपनी सध्या संपूर्ण भारत आणि तब्बल २०० देशांमध्ये कुरिअर सेवा पुरवीत आहे. हे जाळे अधिक वाढविण्याचा मानस भाविकने बोलून दाखविला. नवउद्यमींना सल्ला

नवउद्योगांना अजूनही खूप मोठी संधी आहे. आजही अनेक क्षेत्र असे आहेत की जे ऑफलाइन पद्धतीने काम करतात. त्यांना तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी नवउद्योग मदत करू शकतात. पण हे जोडत असताना त्या मूळ व्यवसायाच्या कामाचे स्वरूप बदलले असे होत नाही तर त्याच्या स्वरूपाप्रमाणे आपल्याला तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यायचे असते. म्हणजे आपण ज्या क्षेत्रात काम करत आहोत त्या क्षेत्राचा पूर्ण अभ्यास करा. एकदा का तुम्ही तो अभ्यास केला की तुम्हाला यश निश्चितच मिळते, असा सल्ला भाविकने दिला.

Niraj.pandit@expressindia.com