पबजी (PUBG) या ऑनलाईन खेळाच्या व्यसनामुळे घडलेले अनेक धक्कादायक प्रकार आपण पाहिलेच आहेत. आता मुंबईतून देखील अशीच एक बातमी समोर येत आहे. एका १६ वर्षीय मुलाने फक्त पबजी खेळण्यासाठी एक धक्कादायक पाऊल उचललं आहे. या मुलाने पबजीसाठी ऑनलाइन व्यवहाराद्वारे आपल्या आईच्या अकाऊंटमधून चक्क १० लाख रुपये खर्च केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे आई-वडिलांनी फटकारल्यानंतर हा मुलगा जोगेश्वरी परिसरातील आपल्या घरातून पळून गेल्याची माहिती समोर येत आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने शुक्रवारी (२७ ऑगस्ट) याबाबत माहिती देताना सांगितलं की, मुलाच्या वडिलांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर, पोलिसांनी गुरुवारी (२६ ऑगस्ट) दुपारी अंधेरी (पूर्व) येथील महाकाली लेणी परिसरात पळून गेलेल्या मुलाचा शोध घेऊन त्याला त्याच्या पालकांकडे पाठवलं आहे.

बुधवारी (२५ ऑगस्ट) संध्याकाळी मुलाच्या वडिलांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार दाखल केल्याचं असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. त्यानंतर, पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला. मुलाच्या वडिलांनी तपासादरम्यान पोलिसांना सांगितलं की, “माझ्या मुलाला गेल्या काही महिन्यांपासून पबजीचं अक्षरशः व्यसन लागलं होतं. यावेळी त्याने मोबाईलवर खेळताना आईच्या बँक खात्यातून १० लाख रुपये खर्च केले.” तर पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, जेव्हा या मुलाच्या आई-वडिलांना या ऑनलाईन व्यवहाराची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी त्याला चांगलंच खडसावलं. त्यानंतर तो पत्र लिहून घर सोडून निघून गेला.”

PUBG मुळे अनेकांच्या आत्महत्या

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात तामिळनाडूमध्ये पबजीच्या व्यसन असलेल्या एका १४ वर्षीय मुलाने आत्महत्या केली होती. या मुलाला त्याच्या पालकांनी पबजी खेळण्यापासून रोखल्यानंतर आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं होतं. तर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पश्चिम बंगालमध्येही देखील असाच प्रकार घडला. पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात एका २१ वर्षीय विद्यार्थ्याने पबजी खेळू न शकल्याने आत्महत्या केली होती. त्यावेळी पोलिसांनी सांगितले होते की, आयटीआयचा विद्यार्थी असलेला प्रीतम हलदर याने चकदाह पोलीस स्टेशन हद्दीतील पूर्बा लालपूर येथील आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली होती.

PUBG बद्दल शास्त्रज्ञांनीही दिला इशारा

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये PUBG खेळण्यावरून झालेल्या वादानंतर जम्मू जिल्ह्यातील आरएस पुरा तहसीलमध्ये ३ लोकांनी एका व्यक्तीची कथित हत्या केली होती. त्याचवेळी, गेल्या वर्षी जुलैमध्ये ‘पबजी’ या ऑनलाइन मोबाईल गेममध्ये हरल्याने निराश झालेल्या नागपूर शहरातील एका १३ वर्षांच्या मुलाने कथितरित्या आत्महत्या केली होती. याच पार्श्वभूमीवर शास्त्रज्ञांनी असा इशारा दिला आहे की, ‘पबजी’ हा ऑनलाईन गेम मुलांना गुन्हेगारीच्या जगाशी ओळख करून देत आहे. त्यांना नकारात्मक विचारांना दिशेने जाण्यास प्रवृत्त करत आहे.