प्रतिनिधी, मुंबई

मोबाइल शौचकुपात पडल्याने तो काढण्यासाठी एका तरुणाने त्यात हात घातल्याने तो अडकला. तो सोडविण्यासाठी त्याला पाच तास धडपड करावी लागली. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी शौचकूप तोडून या तरुणाची सुटका केली.

रोहित राजभर (वय २३) असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेश येथील आझमगडचा राहणारा आहे. चार दिवसांपूर्वी रोहित कुर्ला पश्चिम येथील गौरी शंकर इमारतीत राहणाऱ्या त्याच्या काकाकडे राहावयास आला होता. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे तो शौचालयात नैसर्गिक विधीसाठी गेला. रोहित शौचालयात जाताना नेहमी त्याचा मोबाइलदेखील घेऊन जायचा. सोमवारीदेखील तो नेहमीच्या सवयीप्रमाणे शौचालयात जाताना  मोबाइल घेऊन गेला होता. मात्र शौचालयात जाताच त्याच्या हातातून मोबाइल खाली पडला. शौचकुपात पडल्याने त्याला तो काढताही येईना.

फोन महागडा असल्याने रोहितने शौचकुपात हात घालून मोबाइल काढण्याचा प्रयत्न केला. त्याच्या हाताला मोबाइल लागलाही. मात्र त्याचा हात शौचकुपातच अडकला. त्याच्या हातात असलेल्या कडय़ामुळे त्याचा हात बाहेरच येईना. त्यातच त्याने शौचालयाला आतून कडी लावल्याने बाहेरून त्याला मदतही मिळत नव्हती.

त्यामुळे त्याने दरवाजावर जोरजोरात लाथा मारल्या. आवाज ऐकून त्याचे काका लालमणी वर्मा यांनी दरवाजा तोडला. मात्र त्यांनी मदत करूनही रोहितचा हात काही मोकळा झाला नाही.

अखेर शेजाऱ्यांनी अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी शौचकूप तोडून पाच तासानंतर रोहितची सुटका करण्यात आली.