स्मरणशक्तीवर विपरीत परिणाम, अस्वस्थता, मानसिक आजारांत वाढ

नववर्षांच्या पाटर्य़ासाठी मुंबईत मोठय़ा प्रमाणात अमली पदार्थाची तस्करी केली जात असल्याचे वृत्त ताजे असतानाच, किशोरवयीन मुलांमध्ये या पदार्थाची ‘नशा’ करण्याचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले आहे. मित्रांच्या संगतीने किंवा ‘हाय’ होण्याच्या आकर्षणातून शाळा-महाविद्यालयांत असल्यापासूनच या मुलांना अमली पदार्थाचे व्यसन जडू लागले आहे. ‘गांजा’,  ‘चरस’, ‘चिलम’, ‘कोकेन’, ‘एमडी’, ‘एलएसडी’, ‘विड’, ‘म्याऊम्याऊ’ यांसारख्या अमली पदार्थापासून ते अगदी व्हाइटनर, बाम हुंगण्यापर्यंतच्या व्यसनांतून ही मुले नशेच्या आहारी जात आहेत. या व्यसनाचा परिणाम फुप्फुस, स्मरणशक्ती, अवयव निकामी होणे, अस्वस्थता, मानसिक आजार वाढत असल्याचे तज्ज्ञांच्या निदर्शनास आले आहे.

[jwplayer zVOMyVTv]

सर्वसाधारणपणे १५ ते १८ या वयोगटातील मुलांमध्ये शाळेच्या सहली, पार्टी, गेट टू गेदर अशा ठिकाणी अमली पदार्थाचे सेवन केले जात आहे. यामध्ये ‘गांजा’, ‘चरस’ हे अमली पदार्थ घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक असून यानंतर ५० रुपयांना मिळणाऱ्या आणि गोळीच्या स्वरूपात असलेल्या ‘म्याऊम्याऊ’ या ड्रग्जचा सर्रास वापर केला जातो, असे राजावाडी आणि फोर्टिस रुग्णालयातील पुनर्वसन केंद्रातील डॉ. परुल तंक यांनी सांगितले. कॉर्पोरेट कर्मचारीही तणाव कमी करण्याचे कारण देत ड्रग्जचे सेवन करतात, असे सांगण्यात येत आहे.

तरुणांमध्ये, त्यातही शालेय मुले प्रयोग करण्यासाठी ड्रग्जचे सेवन सुरू करतात. ड्रग्जच्या आहारी गेलेले रुग्ण ड्रग्जच्या अधीन झाले असल्याचे मान्य करीत नाही, त्यामुळे उपचार करण्यास अधिक वेळ लागतो. काही वेळा ‘फील गुड’साठी तरुण ड्रग्जचे सेवन करतात, असे हिरानंदानी रुग्णालयाच्या मनोविकारतज्ज्ञ ज्योती सांगले यांनी सांगितले. मुंबईतील केईएम रुग्णालयात ड्रग्जच्या आहारी गेलेल्या रुग्णांसाठी विशेष केंद्र आहे. व्यसनाच्या तीव्रतेनुसार रुग्णालयात दाखल करून औषधांनी आणि समुपदेश करून रुग्णांना ड्रग्जच्या विळख्यातून बाहेर काढले जाते. ‘गांजा’, ‘चरस’बरोबरच छोटय़ा सापांचा दंश घेणारा ड्रग्जचा प्रकारही घेतला जातो, असे केईएम रुग्णालयातील पुनर्वसन केंद्रातील वसंत सुतार यांनी सांगितले.

ड्रग्ज सेवनाचा परिणाम मज्जासंस्थेवर होत असतो. त्याचबरोबर स्मरणशक्ती कमी होणे, मेंदूसंबंधित आजार, निद्रानाश, पोटाचे आजार, हृदयाचे ठोके वाढणे असे आजार उद्भवतात. धूम्रपानाच्या रूपात ड्रग्ज घेतले जात असेल तर फुप्फुसाचे आजार होतात.

केंद्र शासनाचा पुढाकार

दिल्लीमध्ये केंद्र शासनाने मोफत सेवा सुरू केल्यानंतर मुंबईतील अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्यामुळे केईएमनंतर आता राजावाडी रुग्णालयातही मोफत उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. याबरोबरच राज्यभरात मोफत केंद्र सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे.

पुनर्वसन केंद्रातील उपचार पद्धती

रुग्णांना ड्रग्जच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी चार सत्रांत उपचार केले जाते. पहिले १५ दिवस औषधे दिल्यानंतर समुपदेशन करून रुग्णांना व्यसनबंदीसाठी प्रोत्साहन दिले जाते. कौटुंबिक सत्रात रुग्ण आणि पालकांमधील संवाद वाढविण्याचे आवाहन केले जाते आणि व्यसनी रुग्णांचे एकत्र सत्र घेऊन एकमेकांच्या अनुभवाचे कथन केले जाते.

[jwplayer PuSvtqP8]