कोटय़वधी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी अहमदाबाद येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक होण्याच्या भीतीने न्यायालयात धाव घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यां तिस्टा सेटलवाड आणि त्यांचे पती जावेद आनंद यांना शुक्रवारी उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला.
अटकपूर्व जामिनासाठी सेटलवाड आणि आनंद यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करीत त्यांना तीन आठवडय़ांचा दिलासा दिला.
गुलबर्ग हाऊसिंग सोसायटीतील गुजरात दंगलीतील पीडिताने सेटलवाड आणि आनंद यांच्याविरुद्ध कोटय़वधी रुपये लाटल्याप्रकरणी अहमदाबादमध्ये गुन्हा दाखल केला आहे. गुजरात दंगलीतील पीडितांना मदत आणि सहकार्य करण्यासाठी सेटलवाड आणि आनंद यांनी ‘सिटिझन्स फॉर जस्टिस अॅण्ड पीस’ ही संस्था स्थापन केली.
या संस्थेच्या माध्यमातूनच ही लूट केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पीडितांना घरे उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली जमविलेला निधी प्रत्यक्ष उपयोगात न आणता तो लुटल्याचा आरोप तक्रारदाराने केला
आहे.
आपल्याला या प्रकरणी गोवण्यात येत असून राजकीय सूड उगविण्याच्या भावनेतून आपल्याविरुद्ध ही तक्रार करण्यात आल्याचा दावा सेटलवाड आणि आनंद यांनी अटकपूर्व जामीन अर्जात केला आहे.