शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकाच्या पहिल्या पानावर आज शुभेच्छा देणारी एक जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातीमधील एका फोटोने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्या फोटोवरुन राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली असून विविध तर्क-वितर्क वर्तवण्यात येत आहेत.

या जाहिरातीमध्ये तेजस ठाकरे यांचा फोटो प्रसिद्ध झाला आहे. तेजस ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा धाकटा मुलगा आहे. उद्धव ठाकरे यांचे थोरले सुपूत्र आदित्य ठाकरे आधीपासूनच राजकारणात सक्रिय आहेत. मागच्या अनेकवर्षांपासून ते शिवसेनेच्या युवा सेनेचे नेतृत्व करत आहेत.

गुरुवारी मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेच्या (सिनेट) निवडणुकीत युवा सेनेने सर्वच्या सर्व दहा जागा जिंकत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि मनविसेला पराभवाची धूळ चारली. या विजयानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी पुढच्या विधानसभा निवडणुकीतही आताच्या जागांपेक्षा दुप्पट जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला.

आदित्य ठाकरेंचे हे विधान म्हणजे आगामी काळात शिवसेनेच्या मुख्य राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत आहेत असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. आदित्य शिवसेनेच्या मुख्य राजकारणात सक्रिय झाल्यास युवा सेनेची कमान तेजस ठाकरे यांच्या हाती येईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

तेजस ठाकरे २२ वर्षांचे असून ते सहसा शिवसेनेच्या कार्यक्रमांमध्ये दिसत नाहीत. आदित्य ठाकरे राजकारणात सक्रिय होणार होते तेव्हा ते उद्धव ठाकरेंसोबत दिसायचे. सामनामध्ये प्रसिद्ध झालेला तेजसचा फोटो त्याच्या राजकीय प्रवेशाचा संकेत असू शकतो. राजकारणापेक्षा वन्यजीवनामध्ये तेजस ठाकरे जास्त रमतात. काका जयदेव ठाकरे यांच्याप्रमाणे त्यांना वन्यजीवनाची जास्त आवड आहे. डिसेंबर २०१६ मध्ये महापालिका निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या शाखांना भेटी दिल्या होत्या. त्यावेळी तेजस उद्धव ठाकरेंसोबत दिसले होते. त्यावेळी सुद्धा त्यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा झाली होती.