प्रवासी संख्या वाढवण्यासाठी कोकण रेल्वेचा पर्याय

विमानासारखी आरामदायी आसनव्यवस्था असतानाही जास्त भाडेदर आणि कमी थांबे यामुळे अपयशी ठरत असलेल्या तेजस एक्स्प्रेसची प्रवासी संख्या वाढवण्यासाठी कोकण रेल्वेने आता ‘डायनॅमिक’ भाडेप्रणाली राबवण्याचा निर्णय घेतला आहे. विमान सेवेप्रमाणे गर्दी आणि कमी गर्दीच्या कालावधीत तेजसचे तिकीट दर बदलण्याचा विचार सुरू असल्याचे कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी सांगितले.

कोकण रेल्वेकडून आखण्यात आलेल्या विविध प्रकल्पांची माहिती गुप्ता यांनी शुक्रवारी मडगांव येथील पत्रकार परिषदेत दिली. या वेळी त्यांनी तेजसच्या तिकीट दरांत चढउतार करण्याचे संकेत दिले. सध्या तेजस गाडीत ‘वातानुकूलित चेअर’ आणि ‘एक्झिक्युटिव्ह’ अशा श्रेणी आहेत. वातानुकूलित चेअरसाठी सीएसएमटी ते करमाळी स्थानकांदरम्यानचे भाडे १५६० रुपये तर एक्झिक्युटिव्हसाठी ३०२५ रुपये इतके आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना या गाडीत अनुक्रमे ११२६ आणि २०२० रुपये आकारण्यात येतात. विशेष म्हणजे, ५ ते ११ वयोगटातील प्रवाशांसाठीही अवाच्या सव्वा भाडे आकारण्यात येते. त्यामुळे या गाडीकडे सर्वसामान्य प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. या पाश्र्वभूमीवर तेजस गाडीसाठी एक वेगळ तिकीट भाडे आकारणी करण्याची योजना आखण्यात येत असल्याचे संजय गुप्ता यांनी सांगितले.गर्दी आणि कमी गर्दीच्या वेळी तिकीट दर कसे असावे, त्याची कशी आकारणी करावी या सर्व बाबी विचारात घेतल्या जाणार आहेत, असे ते म्हणाले.