पावसाळा म्हटलं की रेल्वेसेवा ठप्प होणे, लांब पल्ल्याच्या गाड्या तासनतास रखडणे, हा अनुभव रेल्वे प्रवाशांना काही नवीन नाही. मात्र, रेल्वेच्या ताफ्यात नव्यानेच दाखल झालेल्या तेजस एक्स्प्रेसने रविवारी प्रवाशांना एक सुखद धक्का दिला. तेजस एक्स्प्रेस रविवारी गोव्याहून मुंबईत दाखल होणार होती. परंतु, काही तांत्रिक अडचणीमुळे तेजस एक्स्प्रेस सुटायला तब्बल तीन तासांचा उशीर झाला. त्यामुळे अनेक प्रवाशांनी नेहमीप्रमाणे रेल्वेच्या नावाने खडे फोडत मुंबईत जायला उशीरच होणार, असे गृहीत धरले होते. मात्र, ही गाडी मुंबईत नियोजित वेळेपेक्षा मिनिटभर आधी पोहचली तेव्हा याच प्रवाशांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यामुळे आता प्रवासी आणि रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये तेजसच्या सुपरफास्ट कामगिरीची चर्चा रंगली आहे. तेजस एक्स्प्रेसचा ताशी वेग २०० किलोमीटर असला तरी मध्य रेल्वेच्या रुळांची क्षमता पाहता ही गाडी पूर्ण क्षमतेने धावणार नाही, हे रेल्वेकडून यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, रविवारी गोव्यातून सुटायला उशीर झाल्यामुळे तेजस एक्स्प्रेसचा वेग नेहमीपेक्षा वाढवण्यात आला. त्यामुळे सकाळी १०.३० वाजता गोव्यातून सुटलेली तेजस एक्स्प्रेस अवघ्या सव्वानऊ तासात म्हणजे रात्री ७.४४ वाजता मुंबईत दाखल झाली. विशेष म्हणजे तेजस एक्स्प्रेसचा हा पहिलाच पावसाळी प्रवास होता. पावसाळ्यात कोकण रेल्वेमार्गावर येणारे अडथळे लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने यापूर्वीच तेजस एक्स्प्रेसच्या प्रवासाला या काळात नेहमीपेक्षा अधिक वेळ लागणार असल्याचे सांगितले होते. मात्र, तरीही तेजसने अवघ्या सव्वानऊ तासांत ७५० किलोमीटरचे अंतर कापून सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले.

‘तेजस’मध्येही काहींनी औकात दाखवली!, हेडफोन्सची चोरी, एलईडीची तोडफोड

पावसाळी वेळापत्रकानुसार तेजस एक्स्प्रेस आठवडय़ातून तीन दिवस धावणार आहे. यामध्ये मुंबई ते गोवा आणि परतीच्या प्रवासाचा समावेश आहे. मात्र, रविवारी या एक्स्प्रेस गाडीचा डबा मुंबईहून गोव्याला पोहोचण्यास उशीर झाल्याने तेजस एक्स्प्रेस सुटायला तब्बल तीन तासांचा उशीर झाला. त्यामुळे तेजस एक्स्प्रेस कुडाळला नियोजित वेळेपेक्षा २ तास १७ मिनिटांनी उशीरा पोहचली. त्यानंतर तेजस एक्स्प्रेसचा वेग वाढवण्यात आल्यामुळे रत्नागिरीत पोहचेपर्यंत हा वेळ एक तासापर्यंत कमी झाला. त्यापुढे तेजस एक्स्प्रेस पनवेलला पोहचली तेव्हा तिला फक्त १४ मिनिटांचा उशीर झाला होता आणि कहर म्हणजे ही गाडी मुंबईत नियोजित वेळेपेक्षा एक मिनीट आधीच पोहचली. गाडीत असणाऱ्याी अत्याधुनिक इलेक्ट्रोमॅटिक ब्रेकिंग प्रणालीमुळे हे शक्य झाल्याचे सांगण्यात येत आहे. वाया गेलेला वेळ भरून काढण्यासाठी करमाळी ते कुडाळ यादरम्यान तेजस एक्स्प्रेस १५३ किमी, कुडाळ ते रत्नागिरीमध्ये १३७ किमी आणि रत्नागिरी ते पनवेलदरम्यान १२५ किमी वेगाने चालवण्यात आल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.

मोदींच्या रॅलीचे ट्रेन भाडे थकवल्यामुळे भाजप नेत्याला रेल्वेच्या नोटिसा