मुंबईत तापमानाचा पारा घसरला असून आज सकाळी मुंबईकर थंडीत कुडकुडत घऱाबाहेर पडत आहेत. मुंबईत यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून १२.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सांताक्रूझ येथे सकाळी ५.३० वाजता १३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. थंडी अचानक वाढल्याने मुंबईकर गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत. फक्त मुंबईच नाही तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा घसरला आहे. पुण्यात ८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. थंडीत पर्यटकांचं आवडतं ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर नाशिकमधील निफाडमध्ये २.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. रात्री ९.४ अंश सेल्सिअस असणारं तापमान सात अंशांनी घसरेललं पहायला मिळालं.

दरम्यान धुळे येथे ६.६, औरंगाबाद ८.१, पालघऱ १४ आणि औरंगाबाद येथे ८.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरींमुळे पुढील काही दिवस तापमानातील घट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शहर आणि परिसरात दोन दिवसांपासून पारा घसरत असून गुरुवारी कमाल तापमानही सरासरी एक ते दोन अंशांनी खाली उतरले होते.

सांताक्रूझ येथे गुरुवारी २५.३ अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली, तर कुलाबा येथील तापमान २६ अंश होते. गेल्या दहा वर्षांत २०१४ आणि २०१२ या दोन वर्षांत कमाल तापमान २६ अंशांपर्यंत घसरल्याची नोंद आहे; परंतु या हंगामात कमाल तापमान २५ अंशांपर्यंत खाली आल्याची विक्रमी नोंद झाली.

कारण काय?
उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरी आणि राज्यातील कोरडय़ा हवामानामुळे बहुतांश ठिकाणी किमान तापमानात घट होऊन थंडीत वाढ झाली आहे. कोकण विभागातील मुंबई, रत्नागिरीसह सर्वच ठिकाणी किमान आणि कमाल तापमान हंगामात प्रथमच सरासरीखाली गेले असल्याने या भागात बोचरी थंडी अवतरली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातील तापमानातही घट झाली आहे. विदर्भातील थंडीच्या लाटेची स्थिती निवळली असली, तरी या भागात अद्यापही गारठा कायम आहे.