सलग चौथ्या दिवशी शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरण होते. रात्री पावसाने हजेरी लावली. कमाल आणि किमान तापमानामध्ये सोमवारी घट नोंदविण्यात आली.

अरबी समुद्रात गुजरातच्या दक्षिणेस तयार झालेली चक्रवाती वर्तुळाकार आणि द्रोणीय स्थितीमुळे शुक्रवारपासून मुंबई आणि परिसरात अनेक ठिकाणी तापमानात मोठी घट होण्याबरोबरच पावसानेदेखील हजेरी लावली. ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमान शुक्रवारी ३० अंशापर्यंत घसरले. त्यामध्ये गेल्या दोन दिवसांत थोडा चढउतार झाला. मात्र सततचे ढगाळ वातावरण आणि पाऊस यामुळे सोमवारी तापमानात एक अंशाची घट झाली. कुलाबा केंद्रावर २७ अंश, तर सांताक्रूझ केंद्रावर २६.९ अंश कमाल तापमान नोंदविण्यात आले. मोसमातील हे सर्वात कमी कमाल तापमान आहे.

रविवारी मध्यरात्री आणि सोमवारी पहाटे शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. कांदिवली १८.६ मिमी, कुलाबा १२.२० मिमी तर अनेक ठिकाणी पाच ते १५ मिमी पाऊस नोंदविण्यात आला.

परिणामी, किमान तापमानातदेखील घट झाली. रविवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या नोंदीनुसार सांताक्रूझ आणि कुलाबा केंद्रावर २२ अंश किमान तापमान नोंदविण्यात आले.

आज तुरळक पावसाची शक्यता

अरबी समुद्रातील घडामोडींमुळे रविवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यात हलका, तर संपूर्ण विदर्भात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.