उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट; उस्मानाबादमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद

मुंबईसह राज्यभरात हवेत गारठा वाढणार असून येत्या दिवसांमध्ये किमान तापमानमध्ये आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. उत्तरेकडील राज्यामध्ये आलेली थंडीची लाट आणि राज्यात येणाऱ्या वाऱ्यांची दिशा उत्तरेकडून असल्याने या वेळेस मुंबईत प्रजासत्ताक दिनाची सकाळ गुलाबी थंडीमध्ये अवतरण्याची शक्यता आहे.

मुंबईत मंगळवारी सांताक्रुझ येथे किमान तापमान १९ अंश से. होते. मागील दोन दिवसांपेक्षा तापमानामध्ये वाढ झाली असली तरी पुढील दिवसांमध्ये किमान तापमानमध्ये २ ते ३ अंश से. घट होणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये सर्वात कमी तापमानाची, १३.६ अंश से.ची नोंद झाली आहे. मागील दहा वर्षांमध्ये तापमान १० अंश से.पर्यंत घसरल्याची नोंद झाली आहे.

विदर्भात ३ अंश से.ची घसरण

विदर्भात मागील दोन दिवसांमध्ये किमान तापमानात सरासरी २ ते ३ अंश से.ची घसरण झाली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडय़ामध्ये किमान तापमानामध्ये घट झाली असून मंगळवारी उस्मानाबाद येथे राज्यातील सर्वात कमी तापमानाची ९ अंश से.ची नोंद झाली आहे.