नववर्षांची सुरुवात थंडीच्या कडाक्याने होणार आहे. विदर्भातील गोंदियामध्ये किमान तापमान आठ अंश सेल्सिअसखाली गेले असून उत्तर दिशेकडून वाहू लागलेल्या वाऱ्यांसोबत उत्तरेच्या राज्यातील थंडीच्या लाटेचा प्रभाव राज्यातही पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या वर्षांच्या पहिल्या महिन्यात थंडीचा कडाका वाढेल. मुंबईतही गेला पंधरवडाभर गारठा वाढला असला तरी गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत डिसेंबर उबदार राहिला.

पंजाब, चंदीगढ, दिल्ली, उत्तर प्रदेशमध्ये थंडीची लाट असून, दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळावरील वाहतूक बंद ठेवण्याचीही वेळ आली. राज्याच्या काही भागांमध्येही थंडीचा कडाका वाढला असून रविवारी गोंदिया येथे ७.६ अंश से. इतके सर्वात कमी तापमान नोंदले गेले. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, प. महाराष्ट्रात पुणे, विदर्भात नागपूर आणि मराठवाडय़ात उस्मानाबाद येथे सकाळचे तापमान १० अंश से.खाली गेले होते. औरंगाबाद, परभणी, चंद्रपूर, वाशिम, वर्धा, जळगाव येथेही तापमान १० ते ११ अंश से. दरम्यान होते. मुंबईत सांताक्रूझ येथे १६.३ अंश से. किमान तापमान होते. आतापर्यंत वाऱ्यांची दिशा ईशान्येकडून होती, मात्र आता वारे उत्तर आणि वायव्येकडून येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उत्तरेतील थंड वारे थेट राज्यात प्रवेश करतील.काही दिवसांत कमाल तापमानात आणखी घट होईल, असा अंदाज मुंबई हवामानशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवला.

मुंबईतील डिसेंबर उबदार

मुंबईतील डिसेंबर महिना मात्र गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत उबदार ठरला. डिसेंबरच्या पहिल्या पंधरवडय़ात किमान तापमान २० अंश से. तर दुसऱ्या पंधरवडय़ात १७ अंश से.दरम्यान राहिले.