किमान तापमानापेक्षा कमाल तापमान कमी..

रविवारी सकाळपासून मुंबईत बरसलेल्या आषाढसरींमुळे कुलाब्यात तापमानाचा नवा अंदाज अनुभवायला मिळाला. ढगांआड दडलेल्या सूर्यामुळे दुपारचे तापमान वाढले तर नाहीच, उलट संततधार सरींमुळे सकाळपेक्षाही कमी झाले. कुलाबा व सांताक्रूझ या दोन्ही ठिकाणी दुपारी कमाल तापमान अवघ्या २६ अंश से.पर्यंतच राहिले. विशेष म्हणजे कुलाब्यातील रविवारचे किमान तापमान २७.८ अंश से. नोंदले गेले असल्याने दिवसभरातील किमान तापमानापेक्षा कमाल तापमान कमी असल्याचे अघटित घडले. त्यामुळे साधारणपणे दिवसाचे सर्वात कमी तापमान हे सकाळी सूर्योदयापूर्वी, तर सर्वाधिक तापमान हे दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास अनुभवायला मिळते. सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत नोंद झालेले किमान तापमान हे त्या संपूर्ण दिवसाचे किमान तापमान ठरते. यानुसार शनिवारी कुलाबा येथे किमान तापमान २८.८ अंश से., तर कमाल  तापमान ३३.२ अंश से. होते.

रविवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या नोंदीनुसार कुलाबा येथे २७.८ अंश से., तर सांताक्रूझ येथे २२ अंश से. किमान तापमान होते. नेहमीच्या सर्वसाधारण दिवसानुसार हेच तापमान ‘किमान’ राहणे अपेक्षित होते. मात्र कुलाबा येथे सकाळी नऊ वाजल्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाला. सूर्योदय होऊनही ढगांच्या दाट आवरणामुळे सूर्यकिरणे जमिनीवर आली नाहीत. शिवाय पावसाच्या सरींमुळे हवा थंड होत गेली. त्यामुळे सकाळी साडेआठ ते रात्री साडेआठपर्यंत सर्वाधिक तापमान २६ अंश से.पर्यंतच पोहोचले. हे तापमान साडेआठपूर्वीच्या किमान तापमानापेक्षाही कमी होते. सांताक्रूझ येथे रात्रीपासूनच पाऊस सुरू असल्याने सकाळचे तापमान २३ अंश से. होते, तर कमाल तापमान २६ अंश से.पर्यंत पोहोचले. त्यामुळे रात्री दिवसभराच्या कमाल व किमान तापमानाच्या नोंदी करताना हवामानशास्त्र विभागाला कुलाब्याच्या किमान तापमानाची जागा रिक्त ठेवावी लागली.

उजाडल्यानंतर मुसळधार पाऊस सुरू झाला की क्वचित वेळा असा प्रकार घडतो. मुंबईत भरपूर पावसाच्या दिवशी सकाळच्या किमान तापमानापेक्षा दुपारचे कमाल तापमान कमी झाल्याच्या नोंदी होतात. सकाळी फारसा पाऊस नसेल तर तापमान वाढते व त्यानंतर पाऊस पडू लागल्यास कमाल तापमान वाढत नाही. रविवारचा दिवस असाच आहे, अशी माहिती मुंबई हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.