थंडीचा कडाका पुन्हा वाढणार; वेधशाळेच्या अधिकाऱ्यांची माहिती
गेला आठवडाभर दररोज अधिकाधिक घसरणाऱ्या पाऱ्याने दोन दिवस उसळी मारली आहे. त्यामुळे थंडी तात्पुरत्या काळासाठी गायब झाली असून पुन्हा थंडी येणार असल्याचे वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सकाळची गुलाबी थंडी फिकी पडली असली तरी दुपारचे तापमान मात्र ३० अंश से.च्या घरातच राहिले आहे.
डिसेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ापासून किमान व कमाल तापमानातही घट होण्यास सुरुवात झाली. सकाळी तापमापकातील पारा शुक्रवारी १४.१ अंश से. पर्यंत खाली आला. निरभ्र आकाश व थेट उत्तरेतून येणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमान १५ अंशांखाली गेले. मात्र ही स्थिती कायम राहणार नसल्याने किमान तापमान पुन्हा एकदा १७ ते १८ अंश से. पर्यंत जाऊ शकते, हा वेधशाळेचा अंदाज दोन दिवसांनी खरा ठरला. शनिवारी किमान तापमान १७. ४ अंश से. तर रविवारी १७. ८ अंश से. नोंदले गेले. सोमवारीही किमान तापमान १७ अंश से. दरम्यान राहणार आहे, त्यानंतर मात्र पुन्हा तापमान खाली घसरण्याची शक्यता आहे. थंडीमध्ये असे चढउतार येणे सामान्य असल्याचे वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
किमान तापमानात तब्बल साडेतीन अंश से. नी वाढ झाली असली तरी कमाल तापमान मात्र स्थिर होते. गेले काही दिवस सांताक्रूझ येथे कमाल ३३ अंश से. तर कुलाबा येथे कमाल ३१ अंश से. तापमानापर्यंत मजल जात होती. मात्र रविवारी सांताक्रूझ येथे ३१.१ अंश से. तर कुलाबा येथे कमाल २९.४ अंश से. तापमानाची नोंद झाली.