दोन दिवस उष्णतेने भाजून निघालेल्या मुंबईला तिसऱ्या दिवशी आराम पडला. सांताक्रूझ येथे रविवारी ४१ अंश से. पर्यंत गेलेले कमाल तापमान मंगळवारी ३२.७ अंश से. पर्यंतच स्थिरावले. मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील कमाल तापमान खाली आले असले तरी उर्वरित राज्यात कमाल तापमान ४० अंश से.च्या घरातच राहिले. राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला येथे ४१.६ अंश से. झाली. गुरुवारी मुंबईतील तापमानात दोन ते तीन अंश से. ने वाढ होणार असल्याचा अंदाज आहे.

राज्यात दोन दिवस पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव वाढला होता.

जमिनीवरून येणाऱ्या तप्त, कोरडय़ा वाऱ्यांमुळे उत्तर कोकणातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड परिसरातील कमाल तापमान ४० अंश से.वर गेले होते. मुंबईत रविवारी ४१ अंश से. व सोमवारी ३८.७ अंश से. कमाल तापमान राहिले. मात्र मंगळवारी तापमानात तब्बल सहा अंश से.ने घट झाली. कोरडय़ा वाऱ्यांपेक्षा समुद्रावरील बाष्पयुक्त दमट वारे प्रभावी ठरल्याने तापमान फारसे वाढले नाही. मात्र हवेतील बाष्प वाढल्याने घामाने मुंबईकर हैराण झाले.

कोकणातील सर्वच जिल्ह्य़ांमध्ये कमाल तापमान कमी राहिले असले तरी उर्वरित राज्यामध्ये मात्र दुपारच्या वेळी तापमापकातील पारा ४० अंश से. पर्यंत झेपावला. भिरा येथे कमाल तापमान ४१ अंश से. होते. मध्य महाराष्ट्रात पुण्यात कमाल तापमान ३८.७ अंश से. नोंदले गेले. मराठवाडा व विदर्भातील सर्वच जिल्ह्य़ांमध्ये कमाल तापमान ४० अंश से. हून अधिक होते.

मुंबईतील कमाल तापमानात घट झाली असली तरी उन्हाळ्याची सुरुवात झाली असून यापुढे तापमानात हळूहळू वाढ होईल, असे हवामानशास्त्र विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

मंगळवारचे कमाल तापमान (अंश से.मध्ये)

सांताक्रूझ – ३२.७, डहाणू – ३२.६, रत्नागिरी – ३२.८, भिरा – ४१, पुणे – ३८.७, अहमदनगर – ४१.५, मालेगाव – ४१.५, सोलापूर – ४०.७, उस्मानाबाद – ३९.३, नांदेड – ४०, नागपूर – ४०.२, अकोला – ४१.६, अमरावती – ४०.४.