तापमानात दोन ते तीन अंश से.ने वाढ होण्याचा अंदाज

मार्च महिना असूनही मागील दोन आठवडे गारवा अनुभवायला येत होता. आता मात्र तापमानात हळूहळू वाढ होण्यास सुरुवात होणार आहे. पूर्वेकडून तप्त जमिनीवरून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने तापमानात दोन ते तीन अंश से.ने वाढ होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

साधारणपणे फेब्रुवारीच्या मध्यावर थंडीने निरोप घेतला की राज्यभरातील तापमान वाढू लागते. कोरडय़ा वाऱ्यांमुळे राज्यातील काही भागात तापमान ४० अंश से.च्या घरात जाते. मात्र गेला आठवडाभर दक्षिण मध्य महाराष्ट्र व कोकणात गारवा जाणवत होता. मध्य महाराष्ट्रात रात्रीचे तापमान चार ते पाच अंश से. कमी झाले होते. त्याचवेळी कोकण परिसरातील दुपारचे तापमानही ३० अंश से. पलीकडे जात नव्हते. आता राज्याच्या उत्तर भागात, वातावरणातील मधल्या पातळीवर प्रतिचक्रीवात स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पूर्वेकडून जमिनीवरून येणाऱ्या कोरडय़ा वाऱ्यांचा प्रभाव येत्या दोन दिवसात वाढणार आहे. या वाऱ्यांमुळे उष्णतेची लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र शनिवारी संध्याकाळपर्यंत केलेल्या निरीक्षणानंतर वातावरणाच्या मधल्या भागातील घडामोडींमुळे तापमानात फारसा फरक पडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

साधारणपणे मार्च-एप्रिल महिन्यात तापमान वाढीला सुरुवात होते. मात्र सध्याची तापमानवाढ ही वातावरणातील स्थानिक घडामोडींचा परिणाम आहे. त्यामुळे तापमानात २ ते ३ अंश से.पर्यंत वाढ होईल. त्यानंतरही तापमान हळूहळू वाढत जाईल. पुढील दोन दिवसात कोकण किनारपट्टीवर वातावरण अंशत ढगाळ राहणार असून पावसाचा शिडकावा होण्याची शक्यता आहे, असे मुंबई हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर म्हणाले.

शनिवारी राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर येथे ४०.४ अंश से. झाली. कोकण किनारपट्टीवर ३० अंश से. तर उर्वरित राज्यात ३६ ते ४० अंश से. कमाल तापमान होते.