उत्तरेकडे आलेल्या थंडीच्या लाटेचा प्रभाव राज्यभर जाणवत असून मुंबईतही गारठा कमालीचा वाढत आहे. बुधवारी नाशिकमध्ये सर्वात कमी म्हणजे ५.८ अंश सेल्सियस तापमान नोंदले गेले तर मुंबईतील तापमान १२.६ अंश से. पर्यंत खाली गेले होते. पुढील आठवडाभर थंडी राहणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज आहे.

हिवाळ्यात मुंबईतील तापमान १५ ते २० अंश  से. दरम्यान राहते. मात्र काही वेळा उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रभाव वाढला की मुंबईतील तापमापकातील पारा आणखी खाली घसरतो. याआधी २४ डिसेंबर रोजी ११.४ अंश से. तापमानाची नोंद झाली होती. २२ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान मुंबईत थंडीचा प्रभाव अधिक होता. या काळात तापमान १३ अंश से. खाली होते. मात्र त्यानंतर जानेवारीत पारा हळूहळू वर सरकू लागला. असे असले तरी किमान तापमान २० अंश से. खाली आणि दुपारचे कमाल तापमानही २८-२९ अंश से .च्या घरातच असल्याने मुंबईकरांसाठी हा काळही आल्हाददायकच होता. मात्र गेल्या तीन दिवसांत गारठा वाढू लागला. शनिवारपासून किमान तापमानात सातत्याने घट होत राहिली आणि बुधवारी सांताक्रूझ येथे १२.६ अंश से. किमान तापमानाची नोंद झाली. कुलाबा येथे तापमान १८ अंश से. होते. कमाल तापमान अनुक्रमे ३०.४ अंश से. व २७.७ अंश से. राहिले.

इतर जिल्ह्यांचे तापमान
निफाड – ६ अंश सेल्सिअस
पुणे – ८.२ अंश सेल्सिअस
नागपूर – १३.४ अंश सेल्सिअस
मुंबई – १२.६ अंश सेल्सिअस
नाशिक – ५.८ अंश सेल्सिअस
औरंगाबाद – १०.६ अंश सेल्सिअस
चंद्रपूर – १६.४ अंश सेल्सिअस
रत्नागिरी -१५.१ अंश सेल्सिअस
सातारा – ११ अंश सेल्सिअस
सांगली – १५.४ अंश सेल्सिअस

गेल्या दहा वर्षांत जानेवारीत तीनवेळा तापमान दहा अंश से.वर गेले होते. जानेवारीतील सर्वात कमी तापमानाचा विक्रम २२ जानेवारी १९६२ मध्ये नोंदला गेला होता. त्यावेळी अवघे ७.४ अंश से. तापमान होते.  पुण्यात गेले काही दिवस सकाळी आणि रात्री थंडी, तर दुपारी ऊन, असे वातावरण होते. बुधवारी मात्र पुणेकरांनी दुपारी थंडी अनुभवली. राज्यातील किमान तापमानाची आकडेवारी पाहता नाशिकनंतर कमी किमान तापमानात अहमदनगरचा (७.६ अंश सेल्सिअस) आणि त्यानंतर पुण्याचाच (८.२ अंश) क्रमांक लागला आहे. नागपूरचे किमान तापमान बुधवारी १३.४ अंश सेल्सिअस राहिले.

महिनाभराच्या विश्रांतीनंतर नाशिकमध्ये पुन्हा एकदा थंडीची लाट आली आहे. आकाश निरभ्र असल्याने पुढील एक ते दोन दिवस ही स्थिती कायम राहणार असल्याचे हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षांना तडे जाण्याची शक्यता बळावल्याने रात्रभर शेकोटय़ा पेटवत उत्पादकांनी बागा थंडीपासून वाचविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.\

थंडीस कारण की..

उत्तरेकडील भागात सध्या बर्फवृष्टी सुरू आहे. त्या भागातून वाहणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव उत्तर महाराष्ट्राच्या वातावरणावर पडतो. त्यात सध्या आकाश निरभ्र असल्याने आणि आद्र्रतेचे प्रमाण कमी झाल्यामुळे नाशिकमध्ये थंडीची लाट आल्याचे हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे.

मुंबईतील सर्वात कमी तापमान..

गेल्या दहा वर्षांतील – १०से. (२९ जानेवारी २०१२)

गेल्या ६५ वर्षांतील – ७.२०से. (२२ जाने. १९६२)

मुंबई १२.६०से , नाशिक, ५.८०सें  नगर ७.६०सें,  पुणे ८.२०सें