मुंबई : मुंबईचा पारा सलग दुसऱ्या दिवशीदेखील चढाच राहिला. सोमवारी अचानक वाढलेल्या कमाल तापमानात केवळ दीड अंशाची घट होऊन ३६.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. तर सांगली, अहमदनगर, सोलापूर, जळगाव आणि रत्नागिरी येथे पारा ३५ अंशाच्या वर राहिला.

सोमवारपासून जमिनीवरून वाहणारे प्रभावी आग्नेय वारे आणि आर्द्रतेचे प्रमाण कमी असल्यामुळे मुंबई आणि उपनगरातील तापमानात अचानक मोठी वाढ झाली होती. सोमवारी सायंकाळी सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३८.१ अंश, तर बोरीवली (पू.) येथे कमाल तापमान ३९.४ अंशावर पोहचले होते. मंगळवारी त्यात दीड अंशाची घट झाली. तर किमान तापमान २२.४ अंश नोंदविण्यात आले.

राज्यभरात मंगळवारी सर्वच ठिकाणी कमाल तापमान ३० ते ३६ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदविण्यात आले. मध्य महाराष्ट्रात किमान तापमान १५ अंश सेल्सिअसवर आणि विदर्भ, मराठवाडय़ात १५ अंशाच्या खाली होते. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट तर उर्वरित भागात किंचित घट झाली. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ तर उर्वरित भागात किंचित वाढ झाली.

राज्यात सर्वात कमी किमान तापमान नागपूर येथे ११.३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.