राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान १० ते १४ अंश असताना रविवारी मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली. कमाल तापमानात ५.५ अंशाने वाढ होऊ न ते ३२ अंश सेल्सिअसवर पोहोचले. तर किमान तापमान १५.५ वरून १७.५ अंशावर पोहोचले.

उत्तर पश्चिम वाऱ्यामुळे गेल्या आठ दिवसांत मुंबईत थंडीची लाट आली. अनेक ठिकाणी तापमान १५ अंशाखाली गेले होते. मात्र वाऱ्याची दिशा बदलून ते दक्षिण पूर्व झाल्यामुळे मुंबईतील तापमानात वाढ झाली. पुढील दोन दिवसांत मुंबईसह मध्य महाराष्ट्रात तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस मुंबईत कमाल तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस तर, किमान तापमान १८ ते १९ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

रविवारी मध्य महाराष्ट्रात किमान तापमान १० ते १६ अंश, विदर्भात १० ते १४ अंश  तर मराठवाडय़ात १० ते १६ अंश नोंदविण्यात आले. विदर्भात अनेक ठिकाणी पारा १० अंशावर होता. कोकणात कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली. किनारपट्टीवर किमान तापमान १५ ते २० अंश दरम्यान होते. हवामान विभागाच्या अनुमानानुसार ७ आणि ९ जानेवारीला विदर्भ आणि संलग्न प्रदेशात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.