विदर्भातील उष्णतेची लाट आणखी तीव्र झाली असून बुधवारी तापमानाचा आलेख आणखी वर गेला. चंद्रपूरमध्ये बुधवारी तब्बल ४५.४ अंश से. कमाल तापमान नोंदले गेले. उन्हाळ्यातील सरासरी तापमानापेक्षा ते चार अंश से. ने जास्त होते. विदर्भातील इतर जिल्हेही उन्हाने पोळून निघाले. मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातही तापमान चाळीशीपलिकडे गेले. गुरुवारीही विदर्भात उष्णतेची लाट राहणार आहे. मुंबईही तापली असून कमाल तापमान सरासरीपेक्षा तीन अंश अधिक वाढले.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात सर्वत्र उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. त्यातच राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भात उष्णतेची लाट झाली आहे. मंगळवारी चंद्रपूर येथे ४४.६ अंश से. तापमान नोंदले गेले. त्यानंतर बुधवारी तापमान आणखी एक अंश से. ने वर गेले. बुधवारी जगातील सर्वाधिक तापमानाच्या ठिकाणांमध्ये चंद्रपूरचा दुसरा क्रमांक होता. सौदी अरेबियातील शरूराह इथे ४६.२ अंश से. तापमान होते. चंद्रपूरसह अकोला (४४ अंश से.), परभणी (४३.६ ), वर्धा (४३.६) आणि नागपूर (४३.२) इथेही तापमापकातील पारा चाळीशीपार गेला. पुणे (३८.९ ), जळगाव (४३), मालेगाव (४२.२), सोलापूर (४१.१) या मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्य़ांमध्येही उन्हाचा ताप  वाढू लागला आहे. कोकण किनारपट्टीवर कमाल तापमान चाळीशीच्या अलिकडे असले तरीही हवेत बाष्पाचे प्रमाण वाढल्याने प्रचंड उकाडा आहे.

गुरुवारीही विदर्भात उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज केंद्रीय हवामानशास्त्र विभागाने नोंदवला आहे. बुधवारी दक्षिण मध्य महाराष्ट्र व कोकणात काही ठिकाणी आकाश ढगाळलेले होते. मात्र गुरुवारपासून संपूर्ण राज्यातील हवा कोरडी होण्याची शक्यता आहे.