तीन महिने थंडी अनुभवल्यानंतर आता मुंबईकरांना उकाडय़ाला सामोरे जावे लागणार आहे. दिवसा तापमानात दोन ते तीन अंश से.ने वाढ होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.
कोणतीही हवामानप्रणाली कार्यरत नसल्याने देशाच्या उत्तर भागात आकाश निरभ्र आहे. थेट सूर्यप्रकाशामुळे उत्तर व वायव्य भागासह मध्य प्रदेशमधील तापमान वाढले आहे. दिल्लीतील कमाल तापमान ३१ अंश से.पर्यंत जात असून रात्री मात्र त्यामानाने थंड आहे. तेथे रात्रीचे तापमान १३ अंश से.पर्यंत खाली जात आहे. हिवाळ्यातील वाऱ्यांची दिशा अजूनही बदलली नसून मुंबईसह राज्यात पूर्व- उत्तरेकडून वारे येत आहेत. मात्र उत्तरेतील तापमान वाढले असल्याने तसेच आकाशही फारसे ढगाळ नसल्याने शहरातील तापमान काहीसे वाढले आहे. गुरुवारी मुंबईत कमाल ३० अंश से. तर किमान १९ अंश से. तापमान नोंदले गेले. पुढील दोन दिवसांत या तापमानात दोन ते तीन अंश से.ने वाढ होण्याची शक्यता आहे.