दिवाळी दारात आली असताना, गारव्याची वाट पाहणाऱ्या मुंबईकरांना मात्र अजूनही घामाच्या धारा पुसाव्या लागत आहेत. पहाटे थंडीत कुडकुडताना केलेल्या पहिल्या आंघोळीच्या आठवणी आता इतिहासजमा झाल्या असून यावेळची दिवाळी तर कडक उन्हात  साजरी करण्याची वेळ आली आहे. रात्री उशिरा सुटणाऱ्या वाऱ्यामुळे सकाळी कमी होणारा उकाडा हाच काय तो थोडाफार दिलासा असू शकेल.
गेल्या काही वर्षांत एखाद्या दिवाळीचा अपवाद वगळता इतर वेळी दिवाळीतून थंडी गायब झाल्याचा अनुभव सर्वानीच घेतला आहे. यावेळची दिवाळीही त्याला अपवाद ठरलेली नाही. गेल्या आठवडय़ापासून सुरू असलेली तापमानातील चढण पुढील दोन दिवसही कायम राहणार आहे. सोमवारी सांताक्रूझ येथे कमाल ३६.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. दिवाळीतही कमाल तापमान ३५ अंशाहून अधिक राहण्याची शक्यता आहे. पावसाळ्यातून हिवाळ्यात ऋतू बदलण्याचा काळ आता संपला आहे. सध्या संध्याकाळपासून आग्नेय आणि पूर्व दिशेकडून जमिनीवरून वारे वाहायला लागले असून दुपारी समुद्रावरून म्हणजे पश्चिम दिशेने वारे वाहत आहेत. पावसाळा नुकताच संपला असल्याने हवेतील बाष्पाचे प्रमाण अजूनही अधिक आहे. त्यातच समुद्रावरून येणारे वारेही दुपारच्या वेळी सोबत भरपूर बाष्प घेऊन येत आहेत. या सगळ्याच्या एकत्रित  परिणामाने मुंबईतील तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढत असून बाष्पामुळे उकाडाही अधिक जाणवत आहे, अशी माहिती मुंबई हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर mum809यांनी दिली. गेल्या दहा वर्षांत ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवडय़ात सर्वाधिक कमाल तापमान नोंदले गेले आहे. त्यामुळे महिना संपताना उकाडा कमी होण्याची शक्यता नाही.
रात्री दहा- साडेदहा वाजण्याच्या सुमारास जमिनीवरून सुटणाऱ्या वाऱ्यांमुळे शहरातील तापमान खाली येण्यास मदत होत आहे. त्यामुळे दिवाळीच्या सकाळी उकाडय़ात होणारी घट एवढाच काय तो दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अर्थात गेल्या काही वर्षांत दिवाळीला सकाळचे किमान तापमानही २० अंश सेल्सिअसच्या खाली गेले नव्हते. त्यामुळे त्याबाबतही फारशी आशा न बाळगलेली बरी..
पाच वर्षांतील ऑक्टोबरमधील
कमाल तापमान
’२० ऑक्टो. २०१३ – ३६.५ अंश से.
’२९ ऑक्टो. २०१२ – ३५.८९ अंश से.
’२८ ऑक्टो. २०११ – ३६.३ अंश से.
’२ ऑक्टो. २०१० – ३६ अंश से.
’३० ऑक्टो. २००९ – ३६.८ अंश से.