राज्य सरकारने आज, सोमवारपासून प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी दिल्याने सर्व प्रमुख धर्मस्थळांच्या व्यवस्थापनांनी करोना प्रतिबंधक उपाययोजना करून भाविकांना प्रवेश देण्याची तयारी केली आहे. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आणि पंढरपुरातील विठ्ठल मंदिर व्यवस्थापनांनी दर्शनासाठी पूर्वनोंदणी बंधनकारक केली आहे. अन्य धर्मस्थळेही भाविकांसाठी सज्ज झाली आहेत.
आम्ही गणेशभक्तांच्या स्वागतासाठी सज्ज आहोत. शासनाचे सर्व नियम पाळून भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. त्याची तयारी मंदिर प्रशासन करीत आहे, असे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी सांगितले. दर्शनासाठी मुखपट्टी बंधनकारक आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझेशनची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षित अंतर नियम पाळून एका वेळी मोजक्या भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. मात्र, सभामंडपात बसण्याची परवानगी सध्या कोणालाही देण्यात येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
तुळजापूर येथील महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचे मंदिर भाविकांसाठी खुले होत आहे. देवीचे मंदिर पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. दर दोन तासांनी ५०० भाविकांना दर्शन घेता येईल. दर्शनासाठी भाविकांना ऑनलाइन आणि ऑफलाइन पास घेणे गरजेचे आहे. मंदिरात दररोज चार हजार भाविकांनाच प्रवेश मिळणार आहे. त्यात एक हजार सशुल्क, तर तीन हजार जणांना मोफत मंदिरप्रवेश असेल, असे तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी सांगितले.
कोल्हापुरातील करवीर निवासिनी महालक्ष्मी आणि दख्खनचा राजा जोतिबा ही दोन प्रमुख मंदिरेही भाविकांसाठी सज्ज आहेत. मंदिरात र्निजतुकीकरण, स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. दिवाळीच्या सुट्टीत हजारो भाविक येण्याची शक्यता असली तरी दररोज दोन ते तीन हजार भाविकांना दर्शनासाठी सोडले जाणार आहे. मंदिराला चार दरवाजे असले तरी पूर्व बाजूच्या दरवाजातून प्रवेश दिला जाणार असून दक्षिण दरवाजातून भाविकांना बाहेर सोडले जाणार आहे. याशिवाय आठवडाभरात मोफत ऑनलाइन दर्शन बुकिंगची सोय केली जाणार आहे, असे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव आणि सचिव विजय पवार यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरामध्ये आजपासून भाविकांना दर्शन घेता येणार आहे. भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार देवस्थानाने नियमावली तयार केली आहे. गडामध्ये जाण्यासाठी टोकन पद्धत अवलंबण्यात आली असून एका वेळी फक्त शंभर भाविकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. गडामध्ये असणाऱ्या कासवावरून देवाच्या मुखदर्शनाची व्यवस्था केली आहे. गडावर पूजा-अभिषेक बंद राहणार असून भंडारा उधळता येणार नाही. भाविक, पुजारी आणि कर्मचाऱ्यांची देवस्थान पूर्ण काळजी घेणार आहे. मुख्य दिंडी दरवाजात भाविकांचे तापमान तपासणी आणि सॅनिटायझरची व्यवस्था केली असून पश्चिम दरवाजातून भाविकांना बाहेर सोडले जाणार आहे. खंडोबाचे दर्शन आणि जागरण-गोंधळासाठी जेजुरीत दररोज मोठय़ा संख्येने नवविवाहित जोडपी येतात. टाळेबंदीच्या काळात लग्न झालेल्या जोडप्यांची गर्दी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती विश्वस्त संदीप जगताप आणि शिवराज झगडे यांनी दिली.
तयारी अशी
* सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करून भाविकांना प्रवेश देण्याची देवस्थाने, प्रार्थनास्थळांनी सज्जता.
* मुखपट्टीचा वापर अनिवार्य, सुरक्षित अंतर नियमाचे पालन, प्रवेशद्वारावर हातांचे निर्जंतुकीकरण आणि आरोग्य तपासणी.
* रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, बालके आणि गर्भवतींना प्रवेशास मनाई. करोना प्रतिबंधासाठी दररोज ठराविक संख्येतच भाविकांना प्रवेश.
सिद्धिविनायक दर्शनासाठी पूर्वनोंदणी
प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरातील प्रवेशासाठी पूर्वनोंदणी बंधनकारक असेल. सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने तयार केलेल्या ‘अॅप’वर पूर्वनोंदणी केल्यावर क्यूआर कोड मिळेल. एका तासात शंभर भाविकांनाच दर्शन घेता येईल. दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये करोनाची कोणतीही लक्षणे नसल्याची नोंद प्रणालीवर झाल्यास त्या नागरिकाला प्रवेश देण्यात येईल. दिवसभरात एक हजार नागरिकांना दर्शन घेता येईल, अशी माहिती न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली.
माहीम चर्चमध्ये वैयक्तिक
प्रार्थनेसच मुभा : माहीम येथील सेंट मायकेल चर्चमध्ये सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत आणि दुपारी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत वैयक्तिक प्रार्थनेसाठी परवानगी असेल. सामुदायिक प्रार्थना लगेच सुरू करण्यात येणार नाहीत, असे चर्चचे फादर लॅन्सी पिंटो यांनी सांगितले.
हाजीअली दर्गा येथे नियमित वेळेनुसार प्रवेश : हाजीअली दर्गा येथे नियमित वेळेनुसार भाविकांना प्रवेश देण्यात येणार आहे. भाविक नियमांचे पालन करतीलच. गर्दीचा आढावा घेऊन गरज असल्यास नियमांत बदल केले जातील, असे ट्रस्टचे अजहर सय्यद यांनी सांगितले.
साई मंदिरात दर्शन व्यवस्था
राहाता : शिर्डी येथील साईबाबा मंदिरात सहा हजार भाविकांची दररोज दर्शनासाठी व्यवस्था करण्यात आली असून यामध्ये तीन हजार भाविक ऑनलाइन तसेच तीन हजार बायोमेट्रिक पासेसच्या माध्यमातून मंदिरात सोडण्यात येतील. भाविकांनी दर्शनापूर्वी आपली आर.टी.पी.सी.आर. चाचणी करणे बंधनकारक आहे.
महालक्ष्मी आणि मुंबादेवी मंदिरात पूजा साहित्य नेण्यास मनाई
महालक्ष्मी आणि मुंबादेवी मंदिरात फुले, पूजासाहित्य, प्रसाद, ओटीचे साहित्य नेण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मंदिरात भाविकांनाही कोणत्याही प्रकारचा प्रसाद देण्यात येणार नाही. अंतर, मुखपट्टी आणि सुरक्षेसाठी आवश्यक सर्व गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, आजारी व्यक्ती यांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार नाही, ’ असे दोन्ही देवस्थानांच्या व्यवस्थापनाने जाहीर केले आहे.
भक्तांच्या श्रद्धेचा विजय – पाटील
मुंबई : महाविकास आघाडी सरकारने अखेरीस राज्यातील मंदिरे व प्रार्थनास्थळे सोमवारपासून उघडण्याची परवानगी दिली असली तरी हा भक्तांच्या श्रद्धेचा विजय आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी सांगितले. मंदिरांमध्ये दर्शन घेताना भाविकांनी करोनाविषयी निर्बंधांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात टाळेबंदी निर्बंध शिथिल करण्याची प्रक्रिया सुरू करून अनेक बाबींना परवानगी दिली, तरी अनेक महिने मंदिरे आणि प्रार्थनास्थळे उघडण्याची परवानगी दिली नव्हती. यासाठी आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या पुढाकाराने मंदिरे उघडण्यासाठी आंदोलने करावी लागली. भाजपने भाविकांच्या आंदोलनांना सक्रिय पाठिंबा दिला. पण सत्तेसाठी महाविकास आघाडी सरकार आंधळे झाले असल्याने मद्यालये उघडण्यास परवानगी दिली तरी देवालये उघडण्यास परवानगी देत नव्हते.
देवस्थाने बंद असल्याने त्यांच्या परिसरात भाविकांची सेवा करणाऱ्या व्यावसायिकांची रोजीरोटी बंद झाली होती. करोनाचे सर्व निर्बंध पाळण्याची तयारी भाविकांनी दाखवली तरीही हे सरकार कठोरपणे परवानगी नाकारत होते, असा आरोपही त्यांनी केला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 16, 2020 12:15 am