नव्या मोटार कायद्याला राज्यात तुर्तास स्थगिती देण्यात आल्याचे आज (बुधवार) परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केले. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना भरमसाठ दंडाची तरतूद या नव्या कायद्यात असल्याने त्याला सर्वसामान्य नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध होताना दिसत आहे. तसेच पुढील महिन्यांत विधानसभा निवडणुका लागणार असल्याच्या पार्श्वभूमीवर रावते यांनी पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केला.

रावते म्हणाले, “नव्या कायद्यानुसार वाढीव दंडाचा फेरविचार करण्याची विनंती केंद्र सरकारकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. तसेच जोपर्यंत केंद्रीय मंत्र्यांचे या पत्राला उत्तर येत नाही तोपर्यंत या कायद्याचा अध्यादेश राज्यात लागू होणार नाही. त्यामुळे राज्यात सध्या जुन्या कायद्याप्रमाणेच दंडवसूली केली जाईल.

दरम्यान, या नव्या कायद्याचे समर्थन करताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच म्हटले की, “नव्या कायद्यातील दंडाची तरतूद ही सरकारी तिजोरी भरण्यासाठी करण्यात आलेली नाही तर, वाहतुकीचे नियम न पाळल्याने होणाऱ्या रस्ते अपघातातील मृतांची संख्या रोखण्यासाठी करण्यात आली आहे.”