तात्पुरत्या करोना रुग्णालयांचे उद्धव ठाकरे यांच्याकडून लोकार्पण

मुंबई : करोनाचा मुकाबला करण्यासाठी मुंबईतील मोकळ्या मैदानांवर अत्याधुनिक उपचार रुग्णालयांची निर्मिती करण्यात आली असून तेथे प्राणवायू आणि अतिदक्षता विभागाची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. ही सुविधा तात्पुरती आहे. त्यामुळे मुंबईत सांसर्गिक आजारांवर अत्याधुनिक उपचार सुविधा असलेले कायमस्वरूपी रुग्णालय उभारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केले.

करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सिडकोच्या सहाय्याने मुलुंड येथे, मुंबई मेट्रोच्या सहकार्याने दहिसरमध्ये, सामाजिक उत्तरदायित्व निधीतून नमन समुहातर्फे महालक्ष्मी रेसकोर्सवर आणि वांद्रे-कुर्ला संकुल येथील अतिदक्षता विभागातील १२० खाटांसह तीन हजार ५२० खाटांचे लोकार्पण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरचिसंवाद (व्हिडिओ कॉन्फरन्स)च्या माध्यमातून मंगळवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर, पालिका आयुक्त आय. एस. चहल आदी उपस्थित होते.  करोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वप्रथम मोकळ्या मैदानावरील रुग्णालये ही संकल्पना आणली. मोकळ्या जागेवरील रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभाग सुरू केला. या सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधा तात्पुरत्या असल्या तरी त्यांचा दर्जा राखला आहे. त्याची उभारणी कायमस्वरूपी रुग्णालयांइतकीच भक्कम आहे, असेही त्यांनी सांगितले.

रोबोटेक तंत्रज्ञान वापरणार

करोना उपचारासाठी जंबो सुविधांचा आदर्श महाराष्ट्राने देशापुढे उभा केला आहे. त्यात ६० टक्के ऑक्सिजनची सुविधा असलेल्या खाटा आणि अतिदक्षता विभागही आहे. यात रोबोटेक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. रुग्णांना उपचाराच्या सुविधा उपलब्ध करतानाच डॉक्टर सुरक्षित राहतील याची काळजी घेतली जात आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.