News Flash

‘सेव्हन हिल्स’साठी डॉक्टर, परिचारिकांची तात्पुरती भरती

परदेशवारी करून परतलेल्या करोना संशयितांसाठी सेव्हन हिल्स रुग्णालयात अलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे

मुंबई : करोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी मुंबई महापालिकेने आता ३० वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार, १२० साहाय्यक वैद्यकीय अधिकारी आणि ४०० प्रशिक्षित अधिपरिचारिकांची तात्पुरत्या स्वरूपात तीन महिन्यांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. अंधेरी येथील मरोळ परिसरातील सेव्हन हिल्स रुग्णालयासाठी ही भरती करण्यात येणार आहे.

परदेशवारी करून परतलेल्या करोना संशयितांसाठी सेव्हन हिल्स रुग्णालयात अलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्यानंतर करोनाबाधितांसाठी याच रुग्णालयात विलगीकरण कक्षाची सुविधाही उपलब्ध करण्यात आली. रुग्णांना  योग्य ती वैद्यकीय सुविधा मिळावी म्हणून वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार, साहाय्यक वैद्यकीय अधिकारी आणि प्रशिक्षित अधिपरिचारिकांची भरती करण्यात येणार आहे. त्यांना अनुक्रमे ३.५ लाख रुपये, ५० हजार ते ८० हजार रुपये आणि ३० हजार रुपये असे वेतन देण्यात येणार आहे.

वरिष्ठ वैद्यकीय सल्लागारपदासाठी इंटेस्टिव्हिस्ट (एमडी मेडिसिन), अ‍ॅनेस्थेटिस्ट (एमडी), नेफ्रोलॉजिस्ट (डीएम), कार्डिओलोजिस्ट (एमडी), न्यूरोलॉजिस्ट (डीएम), तसेच साहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदासाठी एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस झालेल्यांना अर्ज करता येतील. बारावी उत्तीर्ण आणि जीएनएम मान्यताप्राप्त नर्सिग कौन्सिलच्या पदवीधारकाला, तसेच योग्य त्या संस्थेत नोंदणीकृत असलेल्याला प्रशिक्षित अधिपरिचारिकापदासाठी अर्ज करता येईल.

मुलाखती २० एप्रिल रोजी

या पदांसाठीचे अर्ज शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपलब्ध आहेत. अर्ज भरून  १५ ते १८ एप्रिल या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत शीव रुग्णालयात सादर करावे. या पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती २० एप्रिल रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत अधिष्ठाता कार्यालय, लोकमान्य टिळक रुग्णालय, शीव येथे घेण्यात येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 1:25 am

Web Title: temporary recruitment of doctors nurses for seven hills hospitals zws 70
Next Stories
1 स्वस्त धान्यासाठी रांगा
2 तीव्र मानसिक आजारांचे रुग्ण अडचणीत
3 करोनाविरोधात मुंबई-पुण्यावर लक्ष
Just Now!
X