करोना कृती दलाचे प्रमुख  आणि प्रिन्स अली खान रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय ओक यांना करोनापश्चात फुप्फुसाचा फायब्रोसिस झाल्याने प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांनी रुग्णालयाच्या सेवेतून  काही काळ विश्रांती घेतली आहे. परंतु करोना कृती दलाचे कामकाज ते सुरूच ठेवणार आहेत.

डॉ. ओक यांना १३ जूनला करोनाची बाधा झाली. काही दिवसांत बरे झाल्यावर ते पुन्हा रुग्णालयात रुजू झाले. परंतु पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यांना मुलुंड फोर्टिस रुग्णालयात दाखल केले. तेथे अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ६ जुलैला ते रुग्णालयातून घरी परतले आणि २६ जुलैला पुन्हा रुग्णालयात कार्यरत झाले. परंतु नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासून पुन्हा त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्यामुळे त्यांनी कार्यकारी पदाच्या कायर्म्भारातून मुक्त होत तीन महिने रुग्णालयाच्या कामकाजातून विश्रांती घेतली आहे. करोना संसर्गादरम्यान फुप्फुसावर अधिक परिणाम झाला होता. त्यामुळे फुप्फुसाचा फायब्रोसिस झाला.

सध्या मी नियमित कामकाज करू शकत असलो तरी थोडा जरी शारीरिक ताण किंवा जिने चढले की मला धाप लागते. रुग्णालयाची जबाबदारी ही फार मोठी असते. त्यामुळे यातून काही काळ विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. कृती दलाचे काम मात्र जोमाने करत राहणार असल्याचे डॉ. ओक यांनी सांगितले.

करोनामुक्त रुग्णांच्या तपासण्या होणे गरजेचे

संसर्गाचा परिणाम झालेल्या काही अंशी रुग्णांमध्ये फायब्रोसिसचा आजार होतो. मी रुग्णालयातच काम करत असल्याने मला फुप्फुसामध्ये होत असलेले बदल लगेच समजले आणि उपचार सुरू केले. परंतु करोनामुक्त रुग्णांना हे बदल लवकर लक्षात येतीलच असे नाही. त्यामुळे रुग्णांच्या करोनातून बरे झाले तरी तपासण्या होणे गरजेचे आहे. रुग्णांनीही कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास  डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास वेळीच उपचार होतील, असे डॉ. ओक यांनी सांगितले.