टाळेबंदीत आर्थिक स्रोत पूर्णपणे थांबल्याने एसटी महामंडळाने रोजंदारीवरील चालक तथा वाहकांच्या सेवेवर आणलेली तात्पुरती स्थगिती मागे घेण्याचे आदेश गुरुवारी काढण्यात आले.

त्याचप्रमाणे अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांच्या प्रशिक्षणासही देण्यात आलेली स्थगिती उठवण्यात आली आहे. त्यामुळे रोजंदारीवरील व अनुकंपा तत्त्वावरील ४,५०० कर्मचारी, उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

टाळेबंदीत काळात एसटीची वाहतूक मोठय़ा प्रमाणात ठप्प झाली आणि आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. पूर्णपणे प्रवासी वाहतूक होत नसल्याने वाहतुकीसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त कर्मचारी उपलब्ध आहेत. त्यामुळे परिस्थिती विचारात घेता सरळसेवा भरती २०१९ अंतर्गत रोजंदारीवरील चालक कम वाहक सेवा तात्पुरती खंडित करण्यात येत असल्याचा निर्णय घेतला होता. भविष्यात आवश्यक असल्यास त्यांना ज्येष्ठतेनुसार पुन्हा सेवेत सामावून घेण्यात येईल, असेही एसटी महामंडळाने स्पष्ट केले होते.

याशिवाय सरळसेवा भरतीअंतर्गत साहाय्यक, लिपिक-टंकलेखक, राज्यसंवर्ग आणि अधिकारी पदे, तसेच अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांचे प्रशिक्षणदेखील तात्पुरत्या स्वरूपात पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आले होते.