यंदाच्या गणेशोत्सवात मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी तब्बल २२४ विशेष गाडय़ा सोडण्याची रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची मोठय़ा अभिमानाने केलेली ही घोषणा वल्गनाच असल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या वर्षी मध्य व कोकण रेल्वे यांनी गणेशोत्सवासाठी २१४ विशेष गाडय़ा सोडल्या होत्या. २०१३च्या तुलनेत ही संख्या तब्बल २०.२२ टक्क्यांनी वाढली होती. मात्र यंदा या विशेष गाडय़ांमध्ये फक्त १० गाडय़ांचीच भर पडणार आहे. ही वाढ फक्त साडेचार टक्के एवढीच आहे.
दरवर्षी पाच ते आठ लाखांपेक्षा जास्त चाकरमानी मुंबईतून कोकणातल्या आपल्या गावाला गणेशोत्सवासाठी जातात. या संख्येत दर दिवशी वाढ होत आहे. त्यासाठी रेल्वे विशेष गाडय़ाही सोडते. गेल्या वर्षी गणेशोत्सवात रेल्वेने चाकरमान्यांसाठी एकूण २१४ विशेष गाडय़ा सोडल्या होत्या. मात्र चिपळूणजवळ मालगाडी घसरल्याने यापैकी अनेक गाडय़ा रद्द करण्यात आल्या होत्या. तरीही गेल्या वर्षी रेल्वेने १३० आरक्षित, ४६ प्रीमियम दरांत आरक्षित आणि ३८ अनारक्षित गाडय़ा सोडल्या होत्या. त्या वर्षी १७२ विशेष गाडय़ांमधून तब्बल १.२१ लाख प्रवाशांनी प्रवास केला होता.
यंदा कोकण रेल्वेने पाठवलेल्या पत्रकानुसार रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी विशेष लक्ष दिल्यामुळे गणेशोत्सवासाठी रेल्वे यंदा २२४ विशेष गाडय़ा चालवणार असल्याचे सांगितले आहे. मात्र प्रत्यक्षात ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत फक्त दहानेच जास्त आहे.
गाडय़ा रिकाम्याच?
आतापर्यंत या २२४ पैकी फक्त ६० विशेष गाडय़ांचीच घोषणा करण्यात आली आहे. या ६० गाडय़ांपैकी बहुतांश गाडय़ा गणेश चतुर्थीच्या आठ ते दहा दिवस आधीच पोहोचणार आहेत. त्या गाडय़ा रिकाम्याच आहेत. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण लवकर करावे, ही  मागणी मागे पडत आहे.  यंदा विशेष गाडय़ांमध्ये फक्त १० गाडय़ांची वाढ झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.