कुटुंबियांना १० लाखांची मदत

मुंबई : केईएम रुग्णालयातील सदोष वैद्यकीय यंत्रामुळे होरपळल्याने प्राण गमावलेल्या चार महिन्यांच्या प्रिन्स राजभर याचा मृतदेह अखेर तीन दिवसांनी त्याच्या पालकांनी सोमवारी ताब्यात घेतला. त्यानंतर दुपारी त्याच्यावर भोईवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

पालिकेतर्फे प्रिन्सच्या कुटुंबियांना सोमवारी आर्थिक सहाय्य म्हणून १० लाख रुपये देण्यात आले.  पालिका प्रशासनाने स्थापन केलेल्या समितीचा अहवाल आणि आम्ही विचारलेल्या लेखी प्रश्नांची उत्तरे देण्याचे आश्वासन आपल्याला देण्यात आल्याचे पिन्सचे वडील पन्नोलाल यांनी सांगितले.

प्रिन्सचा मृतदेह त्याच्या पालकांनी ताब्यात घ्यावा यासाठी पोलीस आणि रुग्णालय प्रशासन तीन दिवसांपासून त्याच्या वडिलांकडे  पाठपुरावा करत होते. प्रिन्सच्या बाबतीत जे घडले तसा प्रसंग कुणावरही उद्भवू नये, अशी भावना पन्न्ोलाल यांनी व्यक्त केली.

दरम्यान, पन्नोलाल यांनी प्रिन्सचे शवविच्छेदन करण्यासाठी तीन वैद्यकीय तज्ज्ञांची समिती नेमण्याची मागणी केली होती. त्यानुसार तीन तज्ज्ञांनी तयार केलेला अहवाल सोमवारी पोलिसांना सादर करण्यात आला. या आठ पानी अहवालात त्याचा प्रिन्सचा मृत्यू होरपळल्यामुळे झाल्याचे म्हटले आहे.