News Flash

ट्रक, बसच्या टोलमध्ये दहा टक्के वाढ

मंत्रिमंडळाचा निर्णय : हलक्या वाहनांना सूट कायम

(संग्रहित छायाचित्र)

आधीच्या सरकारच्या काळात हलक्या वाहनांना देण्यात आलेल्या टोलमाफीमुळे होणारी ३५० ते ४०० कोटींची तूट भरून काढण्यासाठी ट्रक, बस आणि अवजड वाहनांच्या टोलच्या दरात सरासरी १० टक्के  वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला. हलक्या वाहनांना ५३ नाक्यांवरील टोलमाफी मात्र कायम राहणार आहे.

फडणवीस सरकारच्या काळात ५३ टोलनाके बंद करण्यात आले होते. यामुळे हलक्या वाहनांच्या चालकांना दिलासा मिळाला होता. टोलनाके बंद झाल्याने ठेकेदारांना दरवर्षी ३५० ते ४०० कोटींची नुकसानभरपाई द्यावी लागते. सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. वस्तू व सेवा करापोटी नुकसानभरपाईची मोठी रक्कम केंद्राकडे थकित आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन देताना सरकारला तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे ठेके दारांना टोलची नुकसानभरपाई सरकारी तिजोरीतून देणे सरकारला कठीण जात होते. त्यावर उपाय म्हणून टोलच्या दरात सरासरी दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. टोलच्या दरात वाढ करण्यात आली असली तरी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून वसूल केल्या जाणाऱ्या टोलच्या तुलनेत वाढीव दर हे कमीच असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

टोलच्या दरात वाढ करण्याबरोबरच टोल वसुलीचा कालावधीही वाढवून देण्यात आला आहे. परिणामी १५ प्रकल्पांच्या ठेके दारांना नुकसानभरपाई द्यावी लागणार नाही. त्यांनी वाढीव टोलच्या माध्यमातून ही रक्कम घ्यावी, अशी तरतूद करण्यात आली आहे. टोल वसुलीसाठी वाहनांची चार श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली होती. नव्या रचनेत पाचवा प्रकार समाविष्ट करण्यात आला आहे.

नवे दर

* ठाणे-भिवंडी-वडपा : मिनी बस व टेम्पो – ८५ रुपये, ट्रक- बस – १७५ रुपये

* भिवंडी चिंचोटी -कामण-अंजूरफाटा ते मानकोली : मिनी बस व टेम्पो – ८५ रुपये, ट्रक व बस – १२५ रुपये

* पुणे – नगर : मिनी बस व टेम्पो – ८५ रु., ट्रक व बस – १७५ रु.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 12:01 am

Web Title: ten percent increase in truck and bus tolls abn 97
Next Stories
1 दीड हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका रद्द!
2 सिंचन घोटाळ्यातील अधिकाऱ्याची महत्त्वाच्या पदावर वर्णी
3 खडसे, शेट्टींसह आठ नावांना आक्षेप घेणाऱ्या याचिकेवर तातडीने अंतरिम दिलासा नाही!
Just Now!
X