मुंबईत सोनसोखळी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. अनेक प्रकारे प्रयत्न करूनही पोलिसांना सोनसाखळी चोरांना आवर घालता आलेला नाही. सोनसाखळी चोर गजाआड राहावेत, यासाठी माजी पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाईही केली. आता या गुन्ह्य़ासाठी दहा वर्षे सजा व्हावी, यासाठी गृहविभाग प्रयत्नशील असून तसा प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
प्रत्येक दिवशी सोनसाखळी चोरीच्या दोन ते तीन घटना घडतात. अनेक गुन्ह्य़ांमध्ये आरोपी सापडणेही मुश्कील होते. एखादा सोनसाखळी चोर सापडलाच तर त्याच्याकडून २० ते ३० गुन्ह्य़ांची उकल होत असे. परंतु या सर्व गुन्ह्य़ांसाठी त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३५६ अन्वये (चोरी) आरोपपत्र दाखल केले जात असे. त्यामुळे या गुन्ह्य़ांमध्ये त्याला दोषी ठरविले गेले तरी कमाल दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जात असे. तुरुंगातून सुटल्यानंतर संबंधित सोनसाखळी चोर पुन्हा सक्रिय होत असे. या चोरांना दहा वर्षे तरी शिक्षा व्हावी, यासाठी पोलीस प्रयत्नशील होते. त्यानुसार आता गृहविभागाने प्रस्ताव तयार केला असून सोनसाखळी चोरांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या ३९२ (जबरी चोरी) अन्वये कारवाई करण्याबाबत सुधारणा करण्याचे प्रस्तावित आहे.
गस्त वाढविण्यावर भर
सोनसाखळी चोरांना आळा बसावा, यासाठी पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांनी पोलिसांची गस्त वाढविण्यावर भर दिला होता. सोनसाखळी चोरांना १० वर्षे शिक्षा झाली तर अशा प्रकारच्या गुन्हेगारीला चांगला आळा बसू शकेल, असा विश्वास भारती यांनी व्यक्त केला आहे.