राज्यात २९ हजार गाड्यांची नोंद; दुचाकींची संख्या अधिक

मुंबई : प्रदूषण कमी करणे व पर्यावरणसंवर्धनासाठी विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबण्यात आले असून राज्यात आतापर्यंत २९ हजार विजेवर धावणाऱ्या वाहनांची नोंद परिवहन विभागाकडे झाली आहे. मात्र, चार्जिंग स्टेशनच्या कमतरतेमुळे सार्वजनिक वाहतुकीसाठी विजेवरील वाहन खरेदी मोठ्या प्रमाणात होत नसल्याचे चित्र आहे. सध्या धावत असलेल्या विजेवरील वाहनांमध्ये दुचाकींची संख्या अधिक आहे.

केंद्र सरकारने विजेवर धावणाऱ्या बसना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असून २०१६ पासून अशी वाहने आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विजेवर धावणारी वाहने फायदेशीर ठरतील आणि त्यासाठी प्रत्येक राज्याने चालना देण्याचे आवाहन के ले. आतापर्यंत राज्यात २९ हजार १२८ विजेवर धावणाऱ्या वाहनांची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक खरेदी दुचाकींची झाली असून २२ हजार ७५५ विजेवरील दुचाकी असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्यापाठोपाठ तीन चाकी प्रकारातील रिक्षा, टेम्पो वाहनांची खरेदी झाली असून त्यांची संख्या ३ हजार ८८२ आहे. अवजड वाहने, प्रवासी बस इत्यादी प्रकारातील वाहनेही घेण्याकडे कल आहे. पंरतु त्याचे प्रमाणही कमीच आहे.

चार्जिंग स्टेशन अपुरीच

सार्वजनिक वाहतुकीसाठी विजेवरील वाहने घेतल्यास त्याच्या चार्जिंग स्टेशनची समस्या कायम आहे. दुचाकी, चारचाकी वाहने वाहन मालक उत्पादकांकडून मिळणाऱ्या साहित्यांमधूनच घरी चार्ज करतात. प्रवासी बस, अवजड वाहने काही खासगी इंधन कं पन्यांच्या चार्जिंग स्टेशनवरच अवलंबून असतात किं वा त्याचेही साहित्य बस मालकाला उपलब्ध के लेले असते. पेट्रोल पंपांप्रमाणे विजेवरील वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन मोठ्या प्रमाणात उभे राहिल्यास सार्वजनिक वाहतुकीसाठीची वाहन खरेदी वाढू शकते, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

एसटीला प्रतीक्षाच : एसटी महामंडळानेही आपल्या ताफ्यात विजेवरील बस दाखल कराव्या, अशा सूचनाही गडकरी यांनी के ल्या होत्या. परंतु विजेवर धावणाऱ्या १०० वातानुकू लित बस दोन वर्षांपासून महामंडळात दाखल झालेल्या आहेत. या बस ३०० ते ४०० किलोमीटरपर्यंत धावू शकतात. परंतु यासाठी चार्जिंग सुविधा उपलब्ध करण्याचा मोठा प्रश्न एसटी महामंडळासमोर आहे. मुंबईतील बेस्ट उपक्रमाकडेही विजेवर चालणाऱ्या के वळ ९६ बस आहेत.