आक्षेपांची चौकशी करणार – अशोक चव्हाण 

मुंबई : मुंबईच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामासाठी राबविण्यात आलेली निविदाप्रक्रिया संशयास्पद आहे, महालेखाकारांनी त्यासंबंधी घेतलेल्या आक्षेपानुसार त्याची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी विधान भवनात माध्यमांशी बोलताना दिली.

विधान परिषदेतही बुधवारी या विषयावर चर्चा झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाकरिता राज्य शासन आग्रही आहे. मात्र यापूर्वी झालेल्या निविदा प्रक्रियेबाबत महालेखाकारांनी उपस्थित केलेल्या गंभीर आक्षेपांची चौकशी करून त्यानंतरच पुढील धोरणात्मक निर्णय घेतले जातील, असे त्यांनी सांगितले.

स्मारकाची निविदा प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने आणि कंत्राटदाराला फायदा होईल, अशा पद्धतीने राबविली आहे, निविदा उघडल्यानंतर तांत्रिक तपशील उघड झाले. त्यामुळे ही प्रक्रियाच संशयास्पद आहे, असे चव्हाण म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे आराध्य दैवत असून, त्यांचे भव्य स्मारक जलदगतीने झाले पाहिजे. निविदा प्रक्रियेवरील महालेखाकारांच्या आक्षेपांबरोबरच पर्यावरणाच्या अनुषंगाने न्यायालयांमध्ये विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे तूर्तास शिवस्मारकाचे काम मागील वर्षभरापासून थांबलेले आहे. तसेच मागील पाच वर्षांत या स्मारकाच्या प्रत्यक्ष कामात विशेष प्रगती झालेली नसल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकरणाचा सर्वोच्च न्यायालयात पाठपुरावा करून स्मारक लवकरात लवकर कसे होईल, यासाठी प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.