नरिमन पॉइंट ते कांदिवलीदरम्यान उभारण्यात येणाऱ्या ३३.२ कि.मी. लांबीच्या सागरी मार्गासाठी येत्या महिन्याभरात निविदा काढण्यात येतील, असे पालिका आयुक्त अजय मेहता यांनी मंगळवारी स्थायी समितीमध्ये जाहीर केले. परिणामी, वाहतुकीला गती देणारा हा प्रकल्प लवकर मार्गी लागेल अशी अपेक्षा व्यक्त होत असून त्यामुळे पश्चिम उपनगरातील रहिवाशांना दिलासा मिळेल.
नरिमन पॉइंट ते कांदिवलीदरम्यान उभारण्यात येणारा सागरी मार्ग कोणत्या विभागातून जाणार याची अजय मेहता यांनी बारकाईने माहिती घेतली. तसेच काही भागांत फिरून हा मार्ग कसा उभारण्यात येणार याची पाहणीही केली. या मार्गात गिरगाव चौपाटीजवळील तांबे चौक ते प्रियदर्शनी पार्कदरम्यान बोगदा खोदण्यात येणार असून तो २ बाय २ पदरी असणार आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालय आणि राज्य सरकारनेही या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे या प्रकल्पातील रस्त्याच्या कामासाठी महिन्याभरात निविदा काढण्याचा मानस अजय मेहता यांनी मंगळवारी व्यक्त केला. स्थायी समिती सदस्यांनी आपल्यासोबत हा मार्ग कोणत्या भागातून कशा पद्धतीने जाणार याची पाहणी करावी. सदस्यांच्या मंजुरीनंतर निविदा मागविण्यात येतील, असे अजय मेहता यांनी या वेळी स्पष्ट केले.
केंद्र सरकारच्या पर्यावरण व वन मंत्रालयाने या प्रकल्पाला आवश्यक ती मंजुरी दिल्याने आता काही ठिकाणी समुद्रामध्ये भराव टाकून सागरी मार्ग उभारणे शक्य होणार आहे. या प्रकल्पामध्ये एकूण १६८ हेक्टर भराव क्षेत्र असणार आहे.
भराव टाकून ८.८७ कि.मी. लांबीचा रस्ता उभारण्यात येणार आहे. खारफुटीमध्ये भराव टाकून ३.३५ कि.मी. रस्ता तयार करण्यात येणार आहे. या मार्गात आठ पूल एक दुपदरी, तर दुसरा चौपदरी बोगदा, ३.०८ कि.मी. लांबीचा उन्नत मार्ग असणार आहे. सागरी मार्ग पूर्ण झाल्यानंतर नरिमन पॉइंट येथून पश्चिम उपनगरांमध्ये जलद गतीने पोहोचता येईल. त्यामुळे इंधनाची बचत होईल. वायू आणि ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी या प्रकल्पाअंतर्गत ठोस उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पामुळे मुंबईकरांना दिलासा मिळू शकेल, असा विश्वास अजय मेहता यांनी यापूर्वीच व्यक्त केला आहे.