१०व्या, ११व्या आणि १२व्या शतकात सध्याच्या मुंबईमध्ये समृद्धी नव्हती. मात्र आज मुंबईत पाहायला मिळते ती समृद्धी विद्यमान महामुंबईला खेटून असलेल्या संजानमध्ये होती. (नव्या प्रांतरचनेनंतर हा भाग गुजरातमध्ये गेला. सध्या तो महाराष्ट्राच्या हद्दीला खेटूनच आहे) हेच उपलब्ध सर्व पुराव्यांवरून स्पष्ट होते. पुरावे आणि इतिहास नेमके काय सांगतो?

संजान

संजान-डहाणू- चिंचणी या परिसरामध्ये आजवर एकूण पाच ताम्रपत्रे सापडली आहेत. त्यातील दोन राष्ट्रकूट, एक शिलाहार तर दोन स्थानिक मोढा राजांची ताम्रपत्रे आहेत. या सर्व ताम्रपत्रांमध्ये आपल्याला संजानचा उल्लेख सापडतो. स्थानिक मोढा राजांचा उल्लेख ही ताम्रपत्रे वगळता कुठेच फारसा सापडत नाही. मात्र ते स्थानिक मोठे राजे होते, या ताम्रपत्रांतून येथील समृद्धी सहज लक्षात येते. ताम्रपत्रे, इथे सापडणाऱ्या पुरातत्त्वीय बाबी आणि इतिहासातील पुरावे यांचा ताळमेळ घालण्याचा प्रयत्न केला तर असे लक्षात येते की, भारतीय पुरातत्त्वाचे जनक डॉ. एच. डी. सांखलिया यांनी ‘संजान म्हणजे सन ९४५ मधील मुंबईच’ हा केलेला उल्लेख नेमका पटणारा आहे.

या शोधप्रवासामध्ये दोन महत्त्वाच्या साहित्यरचना आपल्याला मदत करतात. त्यात १६०० सालच्या डिसेंबरमध्ये एडी दस्तूर संजाना यांनी फारसीमध्ये लिहिलेले ‘किस्से-इ-संजान’ महत्त्वाचे ठरते. या काव्यरचनेतील उल्लेखानुसार, ससानिअन इराण वंशाचा राजा शहेनशाह यझदे गर्ग शेरीयार ६४१ साली नेहावनच्या युद्धामध्ये पराभूत झाला. ६५१ साली त्याचे निधन झाले. बहुतांश इराण त्यावेळेस अरब आक्रमकांच्या ताब्यात गेले होते. हे काव्य म्हणजे ही एका मोठय़ा गटाची कथा आहे. हा मोठा गट खोरासनच्या डोंगरात असलेल्या स्थानिक ससानिअन राजघराण्याला शरण गेला. शंभर वर्षांनंतर तो प्रांतदेखील अरब मुस्लिमांनी जिंकला. त्यानंतर शरणार्थीचा हा मोठा गट होर्मुझला आला.  याच बंदरावरून ३० वर्षांनंतर त्यांनी भारतात जाण्यासाठी प्रवासाला सुरुवात केली. त्यांचा पहिला मुक्काम दीव बेटावर झाला. तिथे ते १९ वर्षे राहिले त्यानंतर एक एक करत त्यांचा पूर्ण गटच भारताच्या किनाऱ्यावर पोहोचला. हा मोठा गट म्हणजेच भारतात आलेले पारशी होत.

त्यावेळेस विद्यमान संजानच्या ठिकाणी एक स्थानिक राजा राज्य करत होता. त्याच्याकडे त्यांनी शरणार्थी म्हणून आश्रय घेतला. जाधन राणा किंवा जाधी राणा असे या स्थानिक राजाच्या नावाचे उल्लेख सापडतात. हा राजा नेमका कोण होता याची माहिती फारशी उपलब्ध नाही. हा स्थानिक आदिवासी राजा असावा. बलसाडपासून ते आताच्या विरापर्यंतचा पट्टा हा आदिवासीबहुल भाग त्याच्या ताब्यात होता.

पारशांमध्ये आम आदमी आणि ब्राह्मण पुरोहित पूजाविधी करणारे अशी गतवारी असते. त्यातील पुरोहित यऊझ दातरेकर याला लढवय्या पुरोहित किंवा देवाचा शिपाई म्हणतात, त्याने स्थानिक राजाकडे जाऊन आपल्या गटासाठी आश्रय मागितला. ‘किस्से इ संजान’नुसार त्यावेळेस राजाने दुधाने भरलेले एक भांडे त्याच्यासमोर धरले आणि सांगितले की, माझे राज्य हे असे आहे. त्यावर त्या देवाच्या शिपायाने त्याच्या झब्ब्यातून  खडीसाखर काढली आणि त्या दुधात मिसळली आणि राजाला सांगितले की, आम्ही एवढे मिसळून जाऊ  की कळणारही नाही आणि त्याच वेळेस या दुधाला गोडी प्राप्त करून देऊ. त्यावर खूश होत राजाने त्यांच्या वसाहतीसाठी जागा दिली. त्यांनी तिथे इराणहून आणलेल्या पवित्र अग्नीने (इराणशहा) नवीन अग्यारी स्थापन केली. ती ज्योत आज उदवाडा इराणशहा अग्यारीमध्ये आहे. या शरणार्थीनी या जागेचं नाव ठेवलं संजान. खोरासणच्या डोंगरामध्ये ज्या ठिकाणी ते प्रथम शरणार्थी म्हणून राहिले त्या संजानची स्मृती त्यांनी इथे या नव्या वसाहतीला तेच नाव देऊन जपली. ते सुखी होते व सुमारे ३०० वर्षे इथे राहिले. आणि नंतर दक्षिण व उत्तर भारतात पसरत गेले.

३०० वर्षांनंतर पुन्हा या ठिकाणीही मुस्लिमांचा हल्ला झाला. स्थानिक राजाने पारशी पुरुषांना युद्धासाठी पाचारण केले. पहिल्या दिवशी पारशी युवा जिंकले. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. अल्फ खान या सुलतान मोहमदाच्या सेनापतीने या युद्धात मुस्लीम सैन्याचे नेतृत्व केले होते. संजान पडले. त्यानंतर इराणशहा म्हणजे ती अग्निज्योत घेऊन पारशी गट अस्वली जवळच्या जंगलात वास्तव्यास गेला. १२ वर्षांनंतर तिथून ते खाली उतरले आणि वांसडाला राहायला गेले. वासं म्हणजे बांबूचे बन. तिथून येण्यास त्रास व्हायचा म्हणून मग नवसारी येथे गेलेल्या गटाने मोठय़ा गटाला नवसारी येथे बोलावले. याच वेळेस पुन्हा मुस्लीम आक्रमणाच्या वेळेस इराणशहा हा पवित्र अग्नी सूरतला ३ वर्षांसाठी नेण्यात आला. तिथून तो परत नवसारीला आणण्यात आला आणि नंतर १७४१- ४२ मध्ये संजाना पुरोहितांनी (प्रिस्ट) इराणशहा घेतला आणि रिकामा केलेला उंटवाडा अर्थात उदवाडा इथे तो प्रस्थापित केला. ही मूळकाव्यातील कथा १६०० सालापर्यंतची आहे. नंतरचा त्याचा विस्तारित भाग आहे. ‘किस्से इ झर्तुस्त्रीयान इ हिंदुस्थान’ या दुसऱ्या साहित्यरचनेमध्येही असेच संदर्भ सापडतात. ते १७९०-१८०० या कालखंडात लिहिलेले आहे. दोन्ही संदर्भ पडताळताना असे लक्षात येते की, पारशी आले ७६५-७८५ साली. तीन चिंचणी ताम्रपत्रे यात राष्ट्रकूट राजाचा उल्लेख हे. इंद्र तिसरा – सन ९२६, कृष्णा तिसरा साल ९३९- ९६७ यात संजानचा उल्लेख येतो आणि ठिकाणाची समृद्धीही कळते. कृष्ण तिसरा याच्या ताम्रपत्रामध्ये तर थेट पारशांचा उल्लेख पारसिकाज असा करण्यात आला आहे.

तिसरे ताम्रपत्र चामुंडराजाचे आहे जो, संजानचा राजा व च्छींतुराज  याचा मांडलिक होता. सन १०३४ च्या शेवटच्या दोन ताम्रपत्रांमध्ये विज्जल राजा संजानपट्टणम असा उल्लेख आहे. सन १०४८ – १०५३ या कालखंडात संजान समृद्ध शहर म्हणून उदयास आलेले दिसते. एका ताम्रपत्रात पारशांसाठी हंजमन असा शब्दप्रयोग आहे पारशी अंजुमन म्हणून ओळखले जातात. इथे लहान बंदरांपासून सुरू झालेला संजानचा प्रवास मोठय़ा शहराच्या दिशेने झालेला दिसतो. ही वाढ तीन टप्प्यांमध्ये झाली आहे. मोढा राजांचे राज्य आगाशी नदीपर्यंत होते. पारशांच्या या आगमनाचे आणि मुंबईशी असलेल्या नात्याचे पुरावे थेट मुंबईमध्ये कान्हेरीच्या लेणी क्रमांक ९०मध्ये पहेलवी शिलालेखामध्येही सापडतात. नवव्या ते १२ व्या शतकापर्यंत संजान हे सुप्रसिद्ध व समृद्ध बंदर होते. कारण तिथे आलेल्या पारशांचा व्यापार आग्नेय आशियात ते आफ्रिका आणि इराण असा सुरू होता. ते इथे आले त्यावेळेस गुजरातमध्ये सोलंकी, तर दख्खनमध्ये राष्ट्रकूट राज्य करत होते. त्यामुळे सुरक्षित अशा संजानच्या आदिवासी पट्टय़ात ते स्थायिक झाले. त्यांनी घेतलेला आश्रय धार्मिक नव्हता तर तो आर्थिक होता. इराणमध्ये असलेल्या स्थानिकांशी त्यांचा व्यापर सुरूच होता. त्याच व्यापाराने या बंदराला आजच्या मुंबईसारखी समृद्धी प्राप्त करून दिली. यातील एका ताम्रपत्रात संजानच्या ताज्जिक गव्हर्नरचा उल्लेख मधुमती असा येतो. ही समृद्धी पाहूनच डॉ. सांखलिया म्हणतात की, संजान हे १० व्या शतकातील मुंबई होते. महत्त्वाचे म्हणजे याच पारशी समाजाच्या योगदानातून आजची समृद्धी मुंबई उभी राहिली आहे.