08 December 2019

News Flash

मुंबईची कूळकथा : दहाव्या शतकातील समृद्धीचे पुरावे!

ढाव बोटींमधून या बंदरांतून वांसडा वूड खास करून बांबू पर्शिअन आखातातील देशांमध्ये निर्यात होत असत.

(संग्रहित छायाचित्र)

संजान

संजान किंवा संयानपट्टणमचा उल्लेख जसा ताम्रपत्रांमध्ये सापडतो तसाच तो ९व्या ते १२व्या शतकापर्यंतच्या अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक नोंदींमध्येही सापडतो. त्यात अरब व्यापारी-अभ्यासक अल बिरादुरी, इब्न हौकाल, अल इश्तकारी आणि प्रसिद्ध इस्लामिक भूगोलतज्ज्ञ अल मसुदी यांचा समावेश आहे. पर्शिअन स्कॉलर बुजुर्ग इब्न शरीयार अल राम हुर्मुझी यांना ‘अजैब अल हिंद’ किताब देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या नोंदींमध्येही संजानच्या समृद्धीच्या उल्लेख येतो. ढाव बोटींमधून या बंदरांतून वांसडा वूड खास करून बांबू पर्शिअन आखातातील देशांमध्ये निर्यात होत असत. मात्र या लिखित नोंदींना पुरातत्त्वीय पुराव्यांची जोड मिळण्यासाठी २००३ साल उजाडावे लागले.

प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ व एशियाटिक सोसायटीचे उपाध्यक्ष प्रा. मणी कामेरकर आणि ‘वर्ल्ड झर्तुस्टी कल्चर फाऊंडेशन’चे  डॉ. होमी ढाला यांनी संजान उत्खननाचा प्रस्ताव तयार करून त्याचे काम कराल का, अशी विचारणा पुरातत्त्वज्ञ डॉ. कुरुश दलाल यांच्याकडे केली. संजानमध्ये पारशांच्या वास्तव्याचे फारसे पुरातत्त्वीय पुरावे मात्र सापडलेले नव्हते. केवळ दंतकथेतून आलेली माहिती हाती होती. उत्खननाची जागा निश्चित करण्यासाठी त्या ठिकाणचे नकाशे घेऊन डॉ. दलाल तिथे पोहोचले. जुन्या संजानवर पुरातत्त्वज्ञ जीवनजी मोदी यांनी उत्खनन केले होते, तर रॉक्सान इराणी यांनी म्हटले होते की, जुन्या संजानवरच नवीन वसलेले आहे. त्यामुळे इथे काही सापडण्याची कोणतीही शक्यता नाही. अभ्यासांती जुने संजान बंदर समुद्रापासून दोन किमी आतमध्ये सापडले. समोर असलेले जहाज पाहण्यासाठी वारोली खाडीजवळ डॉ. दलाल प्रत्यक्षात उतरले त्याच ठिकाणी काही जुनी खापरे सापडली.

त्याच ठिकाणी एकाने गुलाबांची शेती करण्यासाठी ट्रॅक्टर चालवला होता. त्यात सापडलेली खापरं मुघलकालीन आहेत, असे सुरुवातीस वाटले होते. पांढऱ्या रंगाची खापरं त्यावर हिरव्या रंगाचा काचेचा थर अशी ही खापरे डेक्कन कॉलेजमध्ये आलेल्या एका अभ्यागत प्राध्यापकाने पाहिली आणि सांगितले की, अशी भांडी इराणमध्ये सातव्या ते अकराव्या शतकापर्यंत प्रचलित होती. ससेनियनोत्तर कालखंडातील व्यापाराचे ते पुरावे आहेत. त्याला ‘टरकॉइज ग्लेझ्डवेअर’ आणि ‘ससेनियअन इस्लामिक टरकॉइज ग्लेझ्डवेअर’ असे म्हटले जाते. त्यानंतर तीन वर्षे डॉ. दलाल यांच्या चमूने संजानमध्ये उत्खनन केले. ते सांगतात, भारतात प्रथमच मोठय़ा प्रमाणावर पश्चिम आशियायी खापरे सापडली. काचेच्या भांडय़ांचे अवशेष सापडले. एका बाजूला वारोली नदी टुक्कर नाला व दुसऱ्या बाजूला कोळी खाडी यांच्या संगमावर त्रिभुज प्रदेशात जुन्या संजानचे अवशेष सापडले. मोठय़ा प्रमाणावर चांदीची व तांब्याची नाणी सापडली. त्यात शिलाहारकालीन गधेनाण्याचाही समावेश होता. १०-११व्या शतकातील सिंधचे राज्यकर्ते अमीर त्यांची नाणीही इथे सापडली. राष्ट्रकुटकालीन नाणे प्रथमच सापडले. त्यावर त्या राजवंशातील सर्वात मोठय़ा राजाचे अर्थात अमोघवर्षांचे नाव लिहिलेले होते. एका बाजूला ब्राह्मीमध्ये श्रीअमोघवस लिहिलेले होते, तर दुसऱ्या बाजूस तोंड डावीकडे असलेल्या हत्तीचे राष्ट्रकुटांचे राजचिन्हही होते. एके ठिकाणी खलीफ हरून अल रशीदच्या चांदीमधील दीनारचा अध्र्याहून थोडा मोठा तुटलेला भागही सापडला.

संजानमधील पारशांच्या वास्तव्याचे अवशेष त्यांच्या दफनभूमीच्या रूपात सापडले. तत्कालीन युद्धातील मोठय़ा प्रमाणावर झालेल्या हत्यांचेच ते अवशेष होते. पारशांच्या दफनभूमीस डोक्मा म्हणतात. त्याचेच हे अवशेष होते. या परिसरात एका सुक्या विहिरीच्या आत चारशे-पाचशे सांगाडय़ांचे अवशेष सापडले. हे सारे कधी तरी होऊन गेलेल्या घनघोर संघर्षांकडेच दिशादर्शन करत होते. शिवाय विटांचे तुकडे, मोठी भांडी सापडली. तिथेच सुल्तान मोहम्मद असे नाव असलेली नाणीही सापडली. याशिवाय बंदरावर शिवकालीन, ब्रिटिशकालीन नाणीही सापडली. इथे चिन्बाय आणि पोर्सेलिन आणि स्टोनवेअर सापडले. त्यावरून असे लक्षात आले की, चीनवरून परतीच्या प्रवासाला निघालेली जहाजेही संजानला थांबायची.  संजान म्हणजे ९४५ सालातील समृद्ध मुंबईच, या भारतीय पुरातत्त्वाचे जनक डॉ. एच. डी. सांकलिया यांनी केलेल्या विधानाला पुरातत्त्वीय आधारच या उत्खननाने मिळाला. आज महामुंबईची हद्द या परिसरापासून सुरू होते आणि आताच्या मुंबईच्या समृद्धीत संजानच्या या किनाऱ्यावर उतरलेल्या याच पारशांचे महत्त्वाचे योगदान आहे, हे विशेष.                                                  (उत्तरार्ध)

vinayak.parab@expressindia.com
@vinayakparab

First Published on September 12, 2018 4:52 am

Web Title: tenth century rich prosperity
Just Now!
X