राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा आज, शुक्रवारपासून (२० नोव्हेंबर) सुरू होत आहे. परीक्षार्थीची संख्या यंदा घटली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या आणि श्रेणी सुधारण्यासाठी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची शुक्रवारपासून फेरपरीक्षा सुरू होत आहे. दरवर्षी जुलैमध्ये फेरपरीक्षा घेण्यात येते, तर सप्टेंबरमध्ये निकाल जाहीर होतात. या विद्यार्थ्यांना त्याच शैक्षणिक वर्षांत पुढील वर्गात प्रवेशही मिळतो. मात्र यंदा करोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा लांबल्या. या फेरपरीक्षेला दहावीच्या ४२ हजार ६३४ विद्यार्थ्यांनी, तर बारावीच्या ६७ हजार ६०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यातील ६७२ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा या परीक्षेची विद्यार्थिसंख्या घटली आहे. साधारण एक ते सव्वा लाख विद्यार्थी फेरपरीक्षा देतात. दहावी आणि बारावीच्या दोन्ही इयत्तांचे मार्चमधील परीक्षेचे वाढलेले निकाल, लांबलेली परीक्षा आणि शैक्षणिक वर्ष, करोनाची धास्ती यामुळे परीक्षार्थीची संख्या काही प्रमाणात घटली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

शाळा कशा सुरू करणार?

राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. मात्र, ज्या शाळांमध्ये परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत, त्या शाळांना वर्ग कसे सुरू करायचे, असा प्रश्न पडला आहे. दरवर्षी दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी एका वर्गात साधारण २५ विद्यार्थ्यांना बसवण्यात येते. सद्य:स्थितीत १२ विद्यार्थीच बसवण्याची सूचना राज्य मंडळाने दिली आहे. त्यामुळे शाळांना आणखी वर्गखोल्या लागणार आहेत. असे असताना नियमित शाळा कशी भरवायची, असा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे सर्व शिक्षकांची करोना चाचणीही झालेली नाही. त्यामुळे आहे त्या मनुष्यबळात परीक्षा आणि नियमित वर्ग कसे सांभाळायचे, असा प्रश्न शाळा व्यवस्थापनांना पडला आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा ५ डिसेंबपर्यंत आहेत. त्यानंतर शाळांमध्ये नियमित वर्ग सुरू करणे योग्य ठरेल, असे मत मुख्याध्यापकांनी व्यक्त केले.