21 October 2020

News Flash

वैद्यकीय अभ्यासक्रमाला आता दहा वर्षांची कालमर्यादा

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत कालमर्यादा नव्हती.

(संग्रहित छायाचित्र)

२०१९-२०च्या तुकडीपासून नियम लागू

मुंबई : वैद्यकीय पदवी (एमबीबीएस) अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मिळणारी अमर्याद कालावधीची सवलत आता संपुष्टात येणार असून प्रवेश घेतल्यापासून दहा वर्षांत विद्यार्थ्यांना पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करावे लागणार आहे. यंदाच्या म्हणजे २०१९-२० या वर्षांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपासून हा नियम लागू होणार आहे.

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत कालमर्यादा नव्हती. साडेचार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अगदी १२-१५ वर्षे घेणारे विद्यार्थीही आढळतात. गेल्या वर्षी वैद्यकीय पदवीचा अभ्यासक्रम बदलला. आता नव्या अभ्यासक्रम आराखडय़ानुसार विद्यार्थ्यांना दहा वर्षांत अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे.

यंदा प्रवेश घेतलेल्या तुकडीला (२०१९-२०) हा नियम लागू करण्यात येणार आहे. पहिल्या वर्षांचा अभ्यासक्रम चार वर्षांत किंवा पुरवणी परीक्षेसह चार प्रयत्नांमध्ये उत्तीर्ण करावा लागेल. एकूण अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी घेण्यासाठी दहा वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे. मात्र, गेल्या वर्षी   प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जुनाच नियम लागू होणार आहे. जानेवारीत  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या नियमानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

परीक्षा वेळापत्रकांतही बदल : सध्या महाविद्यालयांमध्ये जुना आणि नवा असे दोन्ही अभ्यासक्रम सुरू आहेत. दोन अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे नियोजन करताना गोंधळ होत आहे. त्या अनुषंगाने परीक्षांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आले आहेत. गेल्या वर्षीच्या नियमित किंवा पुनर्परीक्षार्थीच्या परीक्षा मे-जूनमध्ये होणार आहेत, तर नवीन अभ्यासक्रमाची परीक्षा सप्टेंबरमध्ये होईल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2020 1:24 am

Web Title: tenure of the mbbs medical course is now for ten years zws 70
Next Stories
1 आरोपींच्या बँक खात्यात रक्कम जमा
2 ‘लोकसत्ता गप्पा’मध्ये  रविवारी रत्ना पाठक-शाह
3 पोलिसाला मारहाण
Just Now!
X