मुंबईतील पहिलीवहिली मेट्रो चालवण्याचा मान असलेल्या रिलायन्स मुंबई मेट्रोवन प्रा. लि. या कंपनीला तोटा होत असल्याचे सांगितले जाते. पण या तोटय़ातही मेट्रोच्या प्रवासी संख्येत नऊ ते दहा टक्के वाढ झाल्याचे दिसत आहे. मुंबईतील एक प्रेक्षणीय स्थळ ठरलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-२चा फायदा हवाई वाहतूक करणाऱ्या प्रवाशांबरोबरच मुंबई मेट्रोलाही झाला असून विमानतळ रस्ता आणि मरोळ या दोन स्थानकांवरील प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. प्रवासी संख्या वाढूनही व्याजापोटी भराव्या लागणाऱ्या रकमेमुळे मुंबई मेट्रोवन प्रा. लि. तोट्यात असल्याचे सांगितले जात आहे. जून,२०१४मध्ये सुरू झालेल्या वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रोवन मार्गाला लोकांची चांगलीच पसंती मिळाली. मेट्रोमध्ये आता दुसऱ्या वर्षांअखेर दैनंदिन प्रवासी संख्या तीन लाखांवर पोहोचली आहे. मेट्रोला प्राप्त होणाऱ्या मासिक उत्पन्नात प्रवासी उत्पन्नाचा वाटा १७ ते १८ कोटी एवढा आहे. त्यात घाटकोपर आणि अंधेरी या दोन स्थानकांचा वाटा सर्वाधिक असणे स्वाभाविक आहे.  वर्षभराच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास मेट्रोच्या घाटकोपर आणि अंधेरी या दोन स्थानकांमधील साकीनाका, मरोळ आणि विमानतळ रस्ता या स्थानकांवरील प्रवासी संख्येत वाढ झाल्याचे दिसते. यात सर्वाधिक वाढ विमानतळ रस्ता या स्थानकावर झाली आहे. टर्मिनल-२ प्रवाशांसाठी सुरू झाल्यानंतर मरोळ आणि विमानतळ रस्ता या दोन स्थानकांमधील प्रवासी संख्या वाढली आहे.   टर्मिनलचा फायदा मेट्रोलाही झाल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले. साकीनाका, अंधेरी आणि घाटकोपर या स्थानकांवरील प्रवासी वाढल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. सध्या घाटकोपर ते वर्सोवा या दरम्यान मेट्रोच्या ३००हून अधिक फेऱ्या होतात. वाढ दिसली, तर या फेऱ्यांमध्येही वाढ करण्यात येईल, अशी माहिती मुंबई मेट्रोवन प्रा. लि.च्या प्रवक्त्यांनी दिली.

स्थानके व प्रवासी संख्या

स्थानक २०१४-१५  २०१५-१६  टक्केवारी

मरोळ २०५६५ २५६२३ २५

साकीनाका  २५७३१ ३०९५८ २५

विमानतळ रस्ता  १०५०० १३७८१ ३१

अंधेरी ५३६७८ ६१३२८ १४

घाटकोपर ७२७०४ ८२७१८ १४