लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : उपनगरी लोकल गाडय़ांसाठी छोटे टर्मिनस परळ स्थानकात बनल्यानंतर आता मेल-एक्स्प्रेस गाडय़ांसाठीही याच परिसरात मोठे टर्मिनस उभारले जाणार आहे. याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर-डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट)नुकताच रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून चर्चेत असलेल्या प्रकल्पाला गती मिळणार आहे.

रेल्वेच्या परळ कार्यशाळेच्या परिसरातच मेल-एक्स्प्रेस गाडय़ांसाठी टर्मिनस उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. याआधी दोन वेळा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आल्यानंतर त्यात काही तांत्रिक मुद्दे उपस्थित झाले. आता करोनाकाळात पुन्हा याचा सविस्तर प्रकल्प अहवाल बोर्डाकडे पाठवला आहे. प्रस्तावानुसार, मेल-एक्स्प्रेस टर्मिनससाठी पाच फलाट बनतील. त्याच्या जवळच या गाडय़ा उभ्या करण्यासाठी आणखी पाच स्टेबलिंग मार्गिकाही बनवल्या जाणार आहेत, तर मेल-एक्स्प्रेस गाडय़ांची व्यवस्थित पाहणी करून त्यात काही तांत्रिक दुरुस्ती करता यावी, यासाठी पाच पिट लाइनही असतील. डीपीआरला मंजुरी मिळाल्यानंतर निविदा व अन्य तांत्रिक मुद्दे सोडवून कामाला गती दिली जाईल. साधारण पाच वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून २०० कोटी रुपयांपेक्षाही जास्त खर्च आहे.

स्थानिकांना फायदा

  • मेल-एक्स्प्रेस गाडय़ांसाठी परळ टर्मिनस बनल्यास दादर, लालबाग, परळ भागांतील स्थानिकांना त्याचा फायदा मिळेल. सीएसएमटीपर्यंत जाणाऱ्या अनेक मेल-एक्स्प्रेस दादर स्थानकापर्यंतच रिकाम्या होतात. सीएसएमटीपर्यंत जाणाऱ्यांची संख्या बरीच कमी असते.
  • सीएसएमटी, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनसमधून सुटणाऱ्या गाडय़ा परळ टर्मिनसमधून सुटतील. त्यामुळे उर्वरित तीन टर्मिनसवरील ताणही कमी होईल.

परळमध्ये मेल-एक्स्प्रेस गाडय़ांसाठी टर्मिनस उभारले जाणार आहे. त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल करोनाकाळातच रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. मंजुरी मिळताच प्रकल्पाला गती मिळेल.
– शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे