दहशतवादी हल्ल्यांच्या खटल्यामध्ये आरोपीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) आणि यूएपीए या दोन्ही कायद्यांखाली गुन्हा दाखल करता येईल, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. या दोन्ही कायद्यांखाली आरोपीवर गुन्हा दाखल करता येणार नाही, असा कनिष्ठ न्यायालयाचा निकाल उच्च न्यायालयाने रद्द ठरविला. न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास यांच्या नेतृत्त्वाखालील पीठाने हा निकाल दिला.
विशेष मोक्का न्यायालयाने २ ऑगस्ट २०१४ रोजी दिलेल्या निकालात पुण्यातील साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी फिरोज ऊर्फ हमजा अब्दुल हमीद सय्यद याच्यावर मोक्का आणि यूएपीए (अनलॉफूल अॅक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन अॅक्ट) या दोन्ही कायद्यांखाली गुन्हा दाखल करण्याला नकार दिला होता. यूएपीए आणि भारतीय दंडविधान संहितेतील कलमांखाली आरोपीवर गुन्हा दाखल करता येईल, असे निर्देश विशेष न्यायालयाने दिले होते. विशेष न्यायालयाच्या या निर्णयाला राज्य सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर झालेल्या सुनावणीवेळी विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी विशेष न्यायालयाचे आदेश रद्दबातल करण्याची मागणी उच्च न्यायालयाकडे केली.